1–2 minutes

नवी मुंबई/पालिका प्रशासन : दक्षिण अफ्रिकेतील मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांनी आपल्या दैनंदिन जीवनात प्रथम सायकलचा वापर वाढवावा, तदनंतरच नवी मुंबईकरांना प्रदूषण संवर्धनाचे ज्ञान पाजारावे. अशी चर्चा रंगली आहे.

शासनाने माथी मारलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यामध्ये ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियानांतर्गत महापालिकेतर्फे ‘स्वच्छता सायक्लोथॉन’ 500 हून अधिक सायकलपटूंच्या सहभागाने यशस्वीरित्या संपन्न झाली. याप्रसंगी, आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी स्वत: सायकल चालवित या उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होऊन स्वच्छता व पर्यावरणाचा संदेश प्रसारित केला.

परंतु, आयुक्तांनी दररोज आपल्या नेरुळ येथील राहता बंगला ते महापालिका मुख्यालय असा 4 किलोमीटर येण्याचा आणि जाण्याचा एकूण 8 किलोमीटरचा प्रवास आलिशान पेट्रोल गाडीने न करता सायकलद्वारे केला तर नक्कीच शहराचे पर्यावरण स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त होण्यास हातभार लागेल.

मात्र, नवी मुंबईकरांना प्रदूषण संवर्धनाबाबत ज्ञानाचे ढोस देणारे कदापी दैनंदिन सायकलचा वापर करणार नसल्याने, पर्यावरण स्वच्छता व प्रदूषण मुक्त करण्यासाठी महापालिकेद्वारे घेण्यात येणारे उपक्रम निव्वळ जनतेचा कररूपी पैशांची उधळपट्टी व प्रशासनाची स्टंटबाजी असल्याचे मत जनतेमध्ये तयार होत आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started