1–2 minutes

पालिका प्रशासन/प्रतिनिधी : नवी मुंबई सेक्टर 15 येथील बेलापूर येथील ‘जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय’ ईमारतीत आज (13 ऑगस्ट 2024 रोजी) उपलब्ध माहितीनुसार किमान चार वेळा विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. ज्यामुळे, ई-फाईलिंगची कामे रखडत असून उकड्याचा त्रास वकील, न्यायाधीश तसेच कोर्टातील कर्मचारी, पोलीस वर्ग आणि आशिलांना सोसावा लागत आहे.

न्यायालय हे न्यायदानाचे मुख्य स्थान असताना या इमारतीला अद्यापही जनरेटर नाही. ज्यामुळे, महावितरणकडून विद्युतपुरवठा खंडित झाल्यावर कोर्टात उपस्थित सर्वानाच मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. तर, वीज गेल्यानंतर वकील, पोलीस आणि संबंधितांना कोर्टाच्या या सहा माळ्यांच्या इमारतीत मजल्यावर पोहचण्याची कसरत करावी लागते.तसेच, अचानकपणे वीज गेल्यामुळे लिफ्टमध्ये अनेकदा विशेषतः वकील आणि पोलीस कर्मचारी अडकण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

त्यामुळे, सदर कोर्ट इमारतीला अतिरिक्त विद्युतपुरवठा देण्यासाठी राज्य शासनाने जनरेटरची उपलब्धता करून देणे आवश्यक आहे. तर, आजच्या घडीला स्थानिक स्वराज्य संस्था असणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय मुख्यालयासाठी जनरेटर तसेच सेन्ट्रलाईज एअर कंडिशन सिस्टीम असताना, ज्या ठिकाणी जनतेच्या न्यायहक्कांसाठी लढले जाते, अश्या न्यायालय इमारतीत जनरेटरची सुविधा उपलब्ध नाही, म्हणजे ही बाब न्यायव्यवस्थेचा पाणउतारा करणारी ठरत आहे. तर, ही न्यायालय इमारत 2017 साली कार्यन्वित झाली आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started