प्रतिनिधी/पालिका प्रशासन : नवी मुंबईतील एका ताईची विकृत मानसिक वृत्तीच्या तीन लोकांनी शिळ-डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हत्या केली. ही बाब अनंत यातना देणारी व निंदनीय आहे. परंतु, आता विविध आणि विशेषतः विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांकडून या घटनेवर राजकारण करण्यास सुरुवात झाली आहे. ही बाब तिरस्कारणीय आहे.
कौटुंबिक वादातून उदभवलेल्या रागातून ‘त्या’ ताईने राहते पारिवारिक घर सोडले. तदनंतर ती अनोळखी अश्या ठिकाणी गेली. मदतीच्या नावाखाली तीन नराधमांनी त्या ताईवर अत्याचार करून, गुन्हा लपविण्यासाठी तिचा खून केला. पोलिसांच्या तत्पर कार्यवाहीमुळे ते तिन्ही आरोपी किमान पुराव्यासाहित पोलिस कोठडीत आहेत. आणि, नव्याने लागू झालेल्या कायद्यान्वये या तिघांनाही न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून अतिवेदनादायी शिक्षा होईलच.
परंतु, त्यागोदरच विरोधी बाकावरील राजकीय पक्षांनी सवयीप्रमाणे राजकीय आरोपांच्या फैरी झाडत सत्ताधारी पक्ष व त्यातील नेत्यांवर बिनबुडाचे शरसंधान करण्यास प्रारंभ केला आहे. अटक, न्यायालयीन कारवाई, साक्षीपुराव्यांची शहानिशा व त्यांनतर आरोपीला शिक्षा असा संपूर्ण क्रमवार प्रक्रिया होण्यास अवधी लागणार आहे. परंतु, न्यायालयीन प्रक्रियेला ठेंगा दाखवत व न्यायालयीन प्रक्रियेस कमी लेखत थेट राजकीय व्यवस्थेतील सत्ताधाऱ्याना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून स्वतःची राजकीय पोळी भाजून/पॉलिटिकल मायलेज मिळवण्याची धडपडही तितकीच निंदनीय आहे.
‘त्या’ ताईच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्याना, जर का जलदगतीने यमसदनी पाठवायचे असेल तर, हा खटला जलदगती न्यायालयात चालवून, सरकारी वकिल म्हणून विशेष उत्तम आणि सूक्ष्म अभ्यासू वकील नेमण्यासाठी सरकारवर दबाव टाकावा आणि त्यास मदतनीस म्हणून या राजकीय पक्षांनी वकील देवून सदर खटल्यावर कायम नजर ठेवावी. आणि, जेथे खटला कमजोर होईल तेथे न्यायिक चौकटीत न्यायालयासमोर पुरावे सक्षमीकरणासाठी ठामपणे उभे रहावे.
तसेच, ‘ती’ ताई कोणा एका समाजाची अथवा जातीची नव्हती त्यामुळे दुःख संबंध मानवजातीला झाले आहे. हे जरा क्रेडिट घेण्यासाठी धडपडणाऱ्या ज्या-त्या राजकीय पक्षांनी व नेत्यांनीही समजून घ्यावे.


