1–2 minutes

मुंबई (पालिका प्रशासन) : विधान परिषदेच्या चार जागांची निवडणूक एकत्र लढवण्याचा महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसचा विचार आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केला परंतु संपर्क होऊ शकला नाही. अर्ज मागे घेण्यास अजून वेळ असून लवकरच यावर निर्णय होईल, अशी आशा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, कोकण, मुंबई व नाशिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून निवडणुका होत आहेत. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर व नाशिकच्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने जाहीर केली होती. परंतु शिवसेनेने परस्पर कोकण, नाशिक व मुंबई मतदार संघासाठीचे उमेदवार जाहीर केले. विधान परिषद निवडणुकीचा निर्णय एकत्र बसून केल्यास महाविकास आघाडीला लोकसभेप्रमाणे चांगले यश मिळू शकेल यासाठी काँग्रेसचा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे यांना संपर्क केला तेव्हा ते परदेशात होते. आज मातोश्रीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही. अजुनही वेळ गेलेली नाही, चर्चेतून मार्ग निघू शकतो असेही नाना पटोले म्हणाले.


Design a site like this with WordPress.com
Get started