प्रतिनिधी/पालिका प्रशासन : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक हे बेलापूर विधानसभेत आपली सक्रियता दाखवत असून, आगामी विधानसभा निवडणुकीत ते बेलापूर मतदार संघातून आमदार म्हणून दाखल होण्यासाठीच्या तयारीत आहेत. मात्र, यामुळे भाजपच्याच या मतदार संघातील आमदारांची डोकेदुखी वाढली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
आताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी दिल्लीत जाण्यासाठी सज्ज असणाऱ्या संजीव नाईक यांना पक्षाने ऐनवेळेस तिकीट नाकारले. त्यामुळे, आता नवी मुंबईतील दोन्ही अश्या ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदारसंघातून अनुक्रमे गणेश नाईक आणि संदीप नाईक आगामी विधानसभा लढवणार आहेत. संदीप नाईक यांनी आपले नाव बेलापूर विभागतील मतदार यादीत समावेश करून घेतले आहे. तसेच, भाजपमधील नाईक समर्थकांना यासाठी कामाला लागण्याचे संदेश देण्यात आला आहे. त्यानुसार, नाईक समर्थक व पक्षातील त्यांचे समर्थक उत्स्फूर्तपणे कामाला लागली आहेत.
तर, दुसरीकडे भाजप कधीही एका परिवारात दोन उमेदवारी देत नाही. या अपेक्षेवर विद्यमान आमदार व त्यांच्या समर्थकांची मदार असल्याचे बोलले जात आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीत भाजपची झालेली पिछेहाट पाहता, भाजप आपले पूर्वापार धोरण बदलून, एकहाती जिंकून येण्याची ताकद बाळगणाऱ्या व तशी हमी असणाऱ्या उमेदवारालाच संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकीत नवी मुंबईच्या दोन्ही जागांवर ‘नाईक’ असतील यात तिळमात्र शंका नाही.

