पालिका प्रशासन (प्रतिनिधी) : राज्यात विधानपरिषदेच्या मुंबई, कोकण आणि नाशिक शिक्षक तसेच पदवीधर मतदार संघात निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यासाठी सत्ताधारी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघातून भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते शिक्षण क्षेत्रातले जानकार धनराज विसपुते हे प्रबळ दावेदार आहेत.
वास्तविक धनराज विसपुते यांची आमदार होण्याची संधी मागच्या नाशिक पदवीधर निवडणुकीवेळी हुकली होती. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा देत भाजपने ऐन निवडणुकीतून माघार घेतल्याने पक्षाचे एबी फॉर्म मिळाल्यानंतर विसपुतेवरही माघार घ्यावी लागली होती. पक्ष नेतृत्वाच्या सूचनेचा आदर करत ऐन निवडणुकीतून माघार घेतल्याने पक्षनेतृत्वाने त्यांचे कौतूकही केले होते. त्यामुळे मागच्या खेपेला हुकलेली आमदारकीची संधी मिळवण्यासाठी धनराज विसपुते यांनी कंबर कसली आहे.
यावेळेस खूप प्रयत्न करून भाजपचा आमदार होण्याचा त्यांचा मानस आहे. यासाठी त्यांनी नव्याने तब्बल 32 हजार मतदारांच्या नावाची नोंदणीदेखील पूर्ण केली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीतही त्यांनी मोठी मेहनत घेत पक्षाला आघाडीवर ठेवले होते. सध्यातरी पक्षातून विसपुते यांना स्पर्धक उमेदवार दिसत नाही. त्यामुळे विसपुतेंना भाजपकडून उमेदवारी देऊन देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे त्यांना रिंगणात उतरवतील आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ भाजपच काबीज करेल अशी चर्चा राज्यात, उत्तर महाराष्ट्रात सुरू आहे.

