प्रतिनिधी/पालिका प्रशासन: महाराष्ट्रातील पाचव्या अंतिम टप्प्यातील निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या. २० मे रोजी मतदार राजा उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद करणार आहे. ठाणे लोकसभा मतदार संघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सरळ लढत आहे. नवी मुंबईमध्ये महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचाराचा झंजावात पाहायला मिळाला. नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वात म्हस्के यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसले.
महायुतीच्या जागा वाटपामध्ये ठाणे लोकसभेची उमेदवारी सर्वात उशिरा जाहीर झाली. ठाणे लोकसभा भाजपा लढवणार की शिवसेना? याची उत्सुकता होती. शेवटी हा मतदारसंघ जागा वाटपामध्ये शिवसेनेकडे गेला. निवडणूक प्रचारासाठी अवघे काही दिवस मिळाले. परंतु या कालावधीतही जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी नियोजनबद्ध प्रचाराची रणनीती आखत ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये नरेश म्हस्के यांच्या प्रचाराचा धुमधडाका लावला. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी भाजपाने देशभरात 400 पार आणि महाराष्ट्रात 45 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा नारा दिलेला आहे. ठाणे लोकसभा मतदार संघाकडे राज्याचे लक्ष लागलं होतं. नवी मुंबईची भूमिका या मतदारसंघांमध्ये निर्णायक ठरणार आहे.
नवी मुंबई हा नाईकांचा बालेकिल्ला मानला जातो. 2019 मध्ये लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर नवी मुंबई हा भाजपाचा गड बनला. दोन वर्षांपूर्वी संदीप नाईक यांची भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. यानंतर नवी मुंबईमध्ये भाजपाचे संघटन अधिक मजबूत झाले. किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रात भाजपाचे कार्यक्रम आणि उपक्रम सर्वाधिक राबवणारा जिल्हा म्हणून नवी मुंबई भाजपाचा लौकिक वाढला.
तब्बल साडेआठ लाख मतदार नवी मुंबईमध्ये आहेत. ठाणे लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी ऐरोली आणि बेलापूर हे दोन विधानसभेचे मतदारसंघ येतात. लोकसभा निवडणुकीच्या निकालाची दिशा नवी मुंबईतील मतदार निश्चित करू शकतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः नवी मुंबईतील कार्यकर्त्यांशी संवाद साधून महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या विजयासाठी आवाहन केले होते. जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी नियोजनपूर्वक प्रचाराची रणनीती आखून नरेश म्हस्के याच्यासाठी नवी मुंबई पिंजून काढली. गेली पंधरा दिवस दिघा ते बेलापूर पर्यंत प्रचार यात्रा, प्रभाग आणि मंडळ निहाय बैठका, विविध समाजाचे मेळावे, कॉर्नर सभा, घरोघरी संपर्क अशा माध्यमातून निवडणूक प्रचाराची राळ उठवली.
नरेश म्हस्के यांना मत म्हणजे नरेंद्र मोदी यांना मत. देशाच्या विकासाला मत, देश सुरक्षित ठेवण्यासाठी मत असे आवाहन जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केले. लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्यासह जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी पूर्णवेळ नरेश म्हस्के यांच्या प्रचारामध्ये स्वतःला झोकून दिले होते. २० मे रोजी महाराष्ट्रातील अंतिम टप्प्यात ठाणे लोकसभेसाठी मतदान होणार आहे. नवी मुंबईकर नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी नरेश म्हस्के यांना मोठ्या मताधिक्याने जिंकून देतील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी व्यक्त केला आहे.
4 जून रोजी नरेंद्र मोदी यांच्या महा विजयाची आणि नरेश म्हस्के यांच्या विजयाची दिवाळी नवी मुंबई साजरी करेल, अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दिली आहे. संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावून नागरिकांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केले आहे.

