1–2 minutes

प्रतिनिधी/पालिका प्रशासन : एकेकाळी सिंचन घोटाळ्यात आरोपी असणारे आणि शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नावर धरणात मु_यची भाषा करणारे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांचा आणि केंद्रात भाजपचे नरेंद्र मोदी यांचे सरकार आणण्यासाठी प्रचार करणे, नवी मुंबईतील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना थोडे जड जात असल्याची खंत काही जणांनी व्यक्त केली.

ठाणे लोकसभा हा मतदारसंघ मुंबईला लागून असल्याने, मुंबईत घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे पडसाद या मतदारसंघात उमटते. 1999 ते 2009 या काळात बंधारे आणि सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला. सिंचनावर 70,000 कोटी रुपये खर्च झाले, पण सिंचन क्षेत्रात केवळ 0.1 टक्क्यांची सुधारणा झाली असं निरीक्षण सरकारच्याच इकोनॉमिक सर्व्हे मध्ये होतं. या काळात अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते. सिंचन प्रकल्पांच्या कंत्राट वाटपात तसंच त्यांच्या पूर्ततेमध्ये अनियमतता आढळली अशी नोंद CAG ने आपल्या अहवालात केली होती. जेव्हा CAGने सिंचन प्रकल्पांमध्ये अनियमितता आहे असं म्हटलं तेव्हा अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते. त्यामुळे या नियमितता आणि गैरव्यवहाराची जबाबदारी अजित पवारांची आहे असे तत्कालीन विरोधी पक्षांनी म्हटलं होते. प्रकल्पांच्या किमतीमध्ये वाढ, अनियमितता आणि जास्त किमतीची बिलं काढण्यात आली, असा आरोप तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता. तर, 2013 साली धरणात पाणी नाही अशी आर्त हाक शेतकऱ्यांची असताना व काहीजण आझाद मैदानात उपोषणाला बसले असताना, “धरणात मु_यचे का?” असे बोलून समस्त शेतकरी व कष्टकरी जनतेचा अपमान करणाऱ्या अजित पवार यांच्याबद्दल शहरवासीयांमध्ये कमालीचा रोष आहे.

महायुतीमधील मित्र पक्षाचा असा भ्रष्ट व अवमानजनक इतिहास असताना, ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यासाठी प्रचार करताना मतदारांचे खडे बोल भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ऐकावे लागत आहे. कारण, सिंचन घोटाळ्याचे तीन बैलगाड्या भरून पुरावे आणणारे भाजपचे नेते आता अजित पवारांच्या खांद्याला खांदा लावून बसत आहेत. आणि ही बाब मतदारांना कुठेतरी नापसंत आहे. ज्यामुळे, एकवेळेस शिंदेसेना चालेल पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत प्रचार करणे ‘पार्टी विथ डिफरन्स’ भाजपला खूपच अडचणीचे ठरत आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started