प्रतिनिधी/पालिका प्रशासन : “दर महिन्याला ठरलेली रक्कम आम्ही पोहचवतो ज्यामुळे आम्ही फुटपाथवरच काय तर रस्त्याच्या मध्यभागी हाथगाडी अथवा विक्रीची गाडी लावली तरी, महापालिकेचा अतिक्रमण विभाग आमच्यावर कारवाई करण्याची हिंमत ठेवत नाही, असे छप्पन अधिकारी आले आणि गेले या सर्वांना आम्ही खिशात ठेवतो” असे प्रशांसक उदगार रस्त्यावर आणि रस्त्याच्या बाजूला खाद्यपदार्थ बनवून विक्री करणाऱ्यांचे सातत्याने ऐकण्यास मिळतात.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मोठ्याप्रमाणात रस्त्याच्या बाजूला चारचाकी आणि हाथगाडीवर गॅसशेगडीचा वापर करून, वडापाव, भजी, पॅटिस, चायनीज, चहा इत्यादीं खाद्यपदार्थ व पेय बनवून विकण्याचा विनापरवाना व्यवसाय बिनधास्तपणे सुरू आहे. ज्यावर, महानगरपालिकेच्या स्थानिक वॉर्ड ऑफिस आणि मुख्यालयातील अतिक्रमण विभागाचा आर्थिक देवाण घेवाण वरदहस्त असल्याने, त्यामुळे यांवर कारवाई होत नसल्याची चर्चा आहे.
तर, वॉर्ड ऑफिस कार्यालय आणि अतिक्रमण विभाग तक्रार प्राप्त झाल्यावरच कारवाईचा दिखावा करून, व्यवसायिक सामान जप्त केले जाते आणि कधी सेटलमेंट करून तर कधी पावती फाडून सदरहू माल/सामान परतही दिले जाते. म्हणजे, पुन्हा रस्त्यावर व्यवसाय करण्याची मोकळीक मिळते. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कालावधीत रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांचा माल जप्त केल्यावर तो नष्ट केला जायचा आणि गाड्या कोपरखैरणेच्या डंपिंग ग्राऊंडवर नेऊन तोडल्या जायच्या, त्यामुळे फुटपाथ व रस्त्याच्या बाजूला खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते.

