प्रतिनिधी/पालिका प्रशासन : देशात सर्वत्र स्वच्छतेचा गाजावाजा सुरू असताना, आणि अस्वच्छतेसबंधी शासनाचे कान न्यायिक पद्धतीने टोचण्यात अग्रेसर असणाऱ्या, न्यायव्यवस्थेतील नवी मुंबई येथील बेलापूर न्यायालयातील स्वच्छतागृहांना निरोगी व स्वच्छतेच्या न्यायापासून वंचित ठेवले आहे की काय? असा प्रश्न येथील स्वच्छतागृहांमधील अस्वच्छता, दुर्गंधी आणि रोगराई पसरवणारी अवस्था पाहून उपस्थित होत आहे.
बेलापूर सेक्टर- 15 येथे “जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय बेलापूर न्यायालय” ईमारत आहे. या इमारतीमध्ये दररोज सुमारे 500हुन अधिक प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. ज्यामध्ये, न्यायालयातील कर्मचारी वर्ग, न्यायाधीश महोदय, वकील, पत्रकार, पोलीस कर्मचारी-अधिकारी आणि आरोपी व त्यांचे नातेवाईक इत्यादींचा समावेश असतो.
मात्र, या न्यायालय ईमारतीमधील स्वच्छतागृहांचा वापर करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वच्छतेच्या निरोगी संकल्पनेला तिलांजली वाहली जात असल्याचे लक्षात येते. तसेच, सदर स्वच्छतागृह वापरताना नाक दाबूनच नैसर्गिक विधी पूर्ण करावा लागतो आहे. तसेच, याठिकाणी येणाऱ्या दुर्गंधीमुळे आजारी पडण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे, नियम, कायदे व स्वच्छतेचे धडे देणाऱ्या अथवा ज्ञान वाटणाऱ्या न्यायालयाने स्व-इमारतीमधील अस्वच्छतेबद्दल प्रकरण चालवून विहित युक्तिवादाला अनुसरून, ही स्वच्छतागृहे कायम स्वच्छ आणि निरोगी राहतील याबाबत न्यायदानाचे कार्य तडीस न्यावे.


