प्रतिनिधी/पालिका प्रशासन : जे लोकप्रतिनिधी पुन्हा कधीच कोणतीही निवडणूक लढणार नाहीत अथवा त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनाही राजकीय संधी मिळणार नाही. मात्र, व्यक्तिगत दुश्मनी काढण्यासाठी हे लोकप्रतिनिधी ठाणे लोकसभेतील भारतीय जनता पार्टीला दुय्यम दाखवून एकप्रकारे स्वतःवर जनतेचा रोष ओढवून घेत आहेत.
ठाणे लोकसभेतून भाजपला तिकीट जाहीर न झाल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी ओढवली ज्याचा उद्रेक राजीनामा देण्याच्या माध्यमातून झाला. परंतु, अश्या परिस्थितही भाजपच्या एका लोकप्रतिनिधीने (जे स्वतः काँग्रेस-राष्ट्रवादी असे वारी करून आलेले आहेत), “राजीनामा देणारे भाजप समर्थक नसून एक व्यक्ती-परिवार समर्थक आहेत. आणि मूळ भाजप कार्यकर्ते – पदाधिकारी व राष्ट्रवादीतून येऊन भाजपमध्ये स्थिरावलेले पदाधिकारी आहेत” असे जाहीर वक्तव्य करून, गटबाजीला खतपाणी घातले.
कोकणातील सात लोकसभा मतदारसंघात केंद्रातील महाशक्ती असणाऱ्या भाजपला मात्र भिवंडी, पालघर आणि सिंधुदुर्ग अश्या तीनच ठिकाणची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे, ज्याप्रकारे राष्ट्रवादीने एकेकाळी काँग्रेसला हळूहळू कोकणातून बाहेर फेकले तशीच परिस्थिती शिंदेसेनेने भाजपवर आणण्यास सुरुवात केली आहे. महत्वाचे म्हणजे हे पांढरेशुभ्र सत्य सत्य समोर दिसत असतानाही भाजपचेच लोकप्रतिनिधी डोंबवलीकरांच्या मदतीने ठाणे लोकसभेत भाजपची खाट पाडण्याचा पक्ष विचारसरणी विरोधी खटाटोप करत आहेत. कारण, त्यांच्यामते “दुश्मनी आधी व नंतर देश-पक्ष” असे समीकरण आहे.

