प्रतिनिधी/पालिका प्रशासन : कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व भ्रष्ट्राचाराला अजिबात थारा न देणारे कर्तव्यदक्ष असे मिलिंद भारंबे यांसारखे पोलीस आयुक्त नवी मुंबईला प्राप्त झाले असताना, कलेक्शन वर्चस्वासाठी स्वतःसोबत पोलीस पत्नीच्या पदाचाही दुरुपयोग सुरू असल्याची एका बॉम्बशोधक पथकातील अधिकाऱ्याची बाब समोर आली आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असा नावलौकिक मिळालेली बाजारपेठ ज्या पोलीस ठाणे अंतर्गत येते, त्या पोलीस ठाणे क्षेत्रातील शासकीय बंदी असणाऱ्या तसेच सरकारी नियमांना फाट्यावर मारून सुरू असलेल्या अवैध व्यवसायधारकांकडून वसुली करण्यासाठी बॉम्बशोध पथकात कार्यरत असणाऱ्या अधिकारी व स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी यांमध्ये कायम खटके उडत असल्याची खबर आहे.
सदर पोलीस स्टेशनमध्ये कितीही वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलले तरी, बॉम्बशोध पथकात तैनात हा अधिकारीच वसुली/कलेक्शनधिकारी असतो. जर यावर कोणी निर्बंध आणण्याचा प्रयत्न केलाच तर हा अधिकारी आपल्या पोलीस पत्नीच्या माध्यमातून दबाव आणतो. अन्यथा, बारचालक महिलेकडून दबाव आणतो. या दोन्ही महिला कोण हे शोधणेही तितकेच महत्वाचे आहे.
आपापल्या क्षेत्रातील कलेक्शनची धुरा स्थानिक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी सांभाळून असतात. परंतु, या प्रकरणात मात्र नियुक्ती एका विभागात आणि कलेक्शन दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात (हद्दीत)! यामुळे, पोलीस दलातच आपापसात वैरमानस्य वाढत असून, याची प्रचिती भविष्यात पोलीस गँगवारमध्ये नागरिकांना पाहवायास मिळू नये. त्यामुळे, पोलीस आयुक्त, उपायुक्त (परि.-1), सहाय्यक आयुक्त (तुर्भे) इत्यादींनी वेळीच या प्रकरणात लक्ष घालणे आवश्यक आहे.

