2–3 minutes

पनवेल/पालिका प्रशासन :  मानवनिर्मित पाणी टंचाईला टँकर माफियांना मिळणारा राजश्रय कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे पाणी साठवणूक केंद्राजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवा आणि त्या टँकरचा नंबर आणि इतर माहितीचे फलक तसेच टँकरवर सुद्धा सिडकोच्या लोगोसह अनुक्रमांक लिहावा. तसेच त्याबाबत सोशल मीडियावर जनहितार्थ माहिती प्रसारित करावी म्हणजे पाणी चोरीला आळा बसेल, असे महत्वपूर्ण मुद्दे पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी मांडले. त्याची अंमलबजावणी करण्याचे संबंधितांना आदेश सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रणिक मूळ यांनी दिले. मूळ यांच्या सिडकोतील दुसर्‍या मजल्यावरील दालनात पनवेल आणि परिसरातील शहरे, ग्रामीण भागातील कृत्रिम पाणी टंचाईवर सखोल चर्चा करून मार्ग काढण्यात आला. बैठकीला सिडकोचे ज्येष्ठ अधिक्षक अभियंता प्रणिक मूळ, पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू, शिलेदार किरण करावकर आणि योगेश पगडे उपस्थित होते.

टँकर माफियांवर तोफ डागताना कडू यांनी आक्रमकपणे पाणी टंचाईला चोरीचा शाप लागल्याचा घणाघाती आरोप केला. नागरिक पाण्यासाठी तडफडत आहेत आणि सिडको, एमजेपी, महापालिकेचे पाणी टंचाईग्रस्त गृह निर्माण सोसायटीच्या नावाने पाळविले जाते. त्याची चढ्या भावाने टँकरद्वारे विक्री केली जात असल्याने सिडकोने तात्काळ सीसीटीव्हीसोबत टँकरमध्ये जीपीएस यंत्रणा बसवावी. तसेच गृहनिर्माण सोसायट्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जातो, त्यांच्याकडून पाण्याच्या टाकीची क्षमता दर्शविणारे पत्र मागून घ्यावे. एकच टँकर दोन ते तीन सोसायट्यांना पुरवून त्याची तीन वेगळी बिले काढली जातात, ही शासनाची दिवाळखोरी टँकर ठेकेदारांकडून केली जाते. जेव्हा टँकर रिकामा केला जातो, त्या जागेवर फोटो काढला जावा म्हणजे चोरी उघडकीस येईल. सिडको, महापालिकेच्या पाणी साठावणूक केंद्रातून पाणी त्यांच्या ठेकेदाराच्या टँकरमार्फत नेले जाते. परंतु, ते गृहनिर्माण सोसायट्यांना मोफत दिले जाते की परस्पर विक्री केली जाते याची शहनिशा सिडकोने भरारी पथकाद्वारे करावी, अशी मागणी केल्याने प्रणिक मूळ यांनी असे आदेश देवून 10 दिवसात अंमलबजावणी करण्याचे फर्मान काढले आहेत.

करंजाडे येथील पाणी माफियांना आळा घालण्यासाठी त्यांचे पंप जप्त करण्याचे आदेश आजच्या बैठकीतून के. बी. पाटील यांनी त्यांच्या अधिकार्‍यांना दिले. त्याशिवाय ही चोरी नेस्तनाबूत करण्यासाठी 15 दिवसात ती जलवाहिनी कायमची बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.करंजाडे येथील पाणी टँकर ठेकेदाराच्या आडमुठ्या धोरणावर सरपंच मंगेश शेलार यांनी कडाडून हल्ला चढविला. तसेच जल जीवनच्या जोडणीविषयी चर्चा घडवून आणली.
कांतीलाल कडू यांनी करंजाडे येथील बौद्धवाडी, गवळीवाडा, वडघर आणि विठ्ठलवाडीच्या पाणी प्रश्‍नावर दहा दिवसात तोडगा काढण्याची मागणी केली आहे. त्याची जबाबदारी मूळ, पाटील आणि भोये आदी अधिकार्‍यांनी स्वीकारली आहे. शेवटच्या मुद्द्यावर बोलताना कडू यांनी पाणी पुरवठा करणार्‍या टँकरची माहिती निविदेतील अटी व शर्थीनुसार आहेत का, त्याची तपासणी करताना उपप्रादेशिक अधिकार्‍यांकडून लेखी माहिती मागवून घ्यावी, असे सुचविले. त्यालाही मूळ यांनी हिरवा कंदिल दाखवत अंमलबजावणी करण्याचे आदेश पारित केले.


Design a site like this with WordPress.com
Get started