प्रतिनिधी/पालिका प्रशासन : ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या जीवनात एकाकीपणा सातत्याने जाणवतो. ज्याचा दुष्परिणाम मानसिक संतुलनावर होत असतो. मात्र, जर का विरंगुळा केंद्राशी ज्येष्ठानी स्वतःला जोडून घेतल्यास हेच विरंगुळा केंद्र एकाकीपणावर रामबाण उपाय ठरू शकतो. असे एकंदरीत मत सीबीडी सेक्टर- ८ येथे आयोजित मार्गदर्शन व्याख्यानात मान्यवरांनी व्यक्त केले. तसेच, सुप्त कलागुणांना वाव दिल्यास एकाकीपणाकडे नैसर्गिकरित्या दुर्लक्ष होत असल्याचेही मान्यवरांनी सांगितले.
सीबीडी सेक्टर- ८ कस्तुरबा गांधी उद्यानातील ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संघटना संचालित विरंगुळा केंद्रात, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व त्यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी मानसशास्त्र पदवीधारक मेघना सोनार आणि नाट्य पुरस्कार प्राप्त रवी वाडकर यांचे मार्गदर्शनत्पर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. विरंगुळा केंद्रात आल्याने समवयस्कांशी संवाद साधता येतो, विचारांची देवाण घेवाण होते, चर्चेतून शंकांचे निरसन करता येते, मानसिकरीत्या सक्रियता राहिल्याने उत्साह निर्माण होतो. त्यामुळे, विरंगुळा केंद्राशी स्वतःला जोडून ठेवल्याने मानसिक व शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहते व आरोग्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना ते फायद्याचे ठरते.
याप्रसंगी, सदर विरंगुळा केंद्राचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर, संघटनेचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी हे मार्गदर्शन व्याख्यानाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.


