1–2 minutes

ठाणे/पालिका प्रशासन : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली व अलौकिक वारशाची महती, त्यांचे कार्य, नीती, चरित्र, विचार व कार्यकुशलतेची जनसामान्यांना, विशेष करून विद्यार्थ्यांना, तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी, या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन शासन,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या उपक्रमाचा महत्वपूर्ण भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत “महानाट्य” या कार्यक्रमाचे सलग 3 दिवस विनामूल्य सादरीकरण होणार आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये दि. 22 मार्च ते दि. 24 मार्च 2024 या तीन दिवसाच्या कालावधीत रोज सायंकाळी 6.30 ते 9.30 या वेळेत हायलॅन्ड मैदान, ढोकाळी, माजिवाडा ठाणे (पश्चिम) या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या महानाट्याच्या विनामूल्य प्रवेशिका डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, गडकरी रंगायतन नाट्यगृह व ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग समितींच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध होणार आहेत. यासाठी “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” असणार आहे. आतापर्यंत हा प्रयोग राज्यात 20 जिल्ह्यांमधील हजारो नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी या महानाट्याचा आनंद अनुभवला आहे. तरी ठाणे जिल्हयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, नागरिकांसाठी विनामूल्य असलेल्या या “महानाट्य” कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started