1–2 minutes

प्रतिनिधी/पालिका प्रशासन : सिडको मेट्रो मार्ग 1 बेलापूर ते पेंधर च्या पुलावर व स्थानकांवर खासगी व्यक्ती/संस्थांकडून मेट्रो प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत भित्तीपत्रके (पोस्टर) लावण्यात आल्याचे तसेच संदेशवहनाच्या तारा (कम्युनिकेशन वायर) टाकण्यात आल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले आहे. या संदर्भातील जाहीर सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून संबंधित व्यक्ती/संस्था यांनी अनिधकृत भित्तीपत्रके व संदेशवहन तारा काढून न टाकल्यास कायदेशीर कारावाई करण्याचा इशारा सिडकोने दिला आहे.

सिडकोच्या मेट्रो मार्ग क्र. 1 वर 17 नोव्हेंबर 2023 पासून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. काही खासगी संस्थांकडून या मेट्रो मार्गावरील पुलावर व स्थानकांवर अनधिकृतरीत्या भित्तीपत्रके लावण्यात आली असून संदेशवहनच्या ताराही टाकण्यात आल्या आहेत. यामुळे मेट्रो गाड्यांच्या परिचालनास व मेट्रो रेल्वेच्या बांधकामांस धोका निर्माण झाला आहे. सिडकोची किंवा मेट्रो प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेता करण्यात आलेल्या अशाप्रकारच्या कृतींना मेट्रो रेल्वे (परिचालन व देखभाल अधिनियम, 2002), उपवाक्य क्र. 62 (2) व 78 नुसार मनाई करण्यात आली आहे.

संबंधित व्यक्ती/संस्था यांनी ही जाहीर सूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 7 दिवसांच्या आत स्वत:हून सदर मार्गावरील अनधिकृत भित्तीपत्रके व संदेशवहन तारा काढून टाकाव्यात. अन्यथा, मेट्रो रेल्वे प्राधिकरणाकडून ही भित्तीपत्रके व संदेशवहन तारा काढण्यात येतील. तसेच भविष्यात मेट्रोशी संबंधित बांधकामांवर अशाप्रकारची भित्तीपत्रके किंवा तारा आढळून आल्यास मेट्रो प्राधिकरणाकडून भित्तीपत्रके व तारा काढण्यात येतील व मेट्रो रेल्वे (परिचालन व देखभाल अधिनियम, 2002), उपवाक्य क्र. 62 (2) व 78 नुसार कायदेशीर कारवाई करून दंड आकारण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी.


Design a site like this with WordPress.com
Get started