1–2 minutes

प्रतिनिधी/पालिका प्रशासन : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप्रणित सरकार देशाच्या विकासाचे वर्षानुवर्षे रखडवलेले स्वप्न पूर्ण करत असून, राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार जनविधायक कार्ये करत असताना, महायुतीमधील नवी मुंबईतील स्थानिक स्वयंघोषित नेते विजय चौगुले यांनी भाजप आमदार लोकनेते गणेश नाईक यांबाबत बेताल व बिनबुडाचे वक्तव्य करून राज्यसरकारच्या महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. असा आरोप भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

शिवसेनेचे विजय चौगुले यांनी आपली वैचारिक उंची बघून टीका करावी असा पलटवार अनंत सुतार यांनी केला आहे. त्याचबरोबर विजय चौगुले महायुतीमध्ये आहेत की विरोधी पक्षात आहेत? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. विजय चौगुले यांनी नवी मुंबईमध्ये हुकूमशाही मोडीत काढू, नवी मुंबई कुणाची जहागीर नाही, अशी टीका गणेश नाईक यांच्यावर केली होती. या टीकेला अनंत सुतार यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे. विजय चौगुले यांच्यावर टीकास्त्र डागताना व्यक्तींचे विचार चांगले पाहिजेत असे नमूद करून बदनाम व्यक्ती ‘तो मी नव्हेच’चा आव आणत आहेत मात्र यांच्या आचार आणि विचाराबद्दल जनतेला सर्व काही ठाऊक असल्याचे सुतार यांनी सांगितले. विजय चौगुले हे मुख्यमंत्र्यांच्या नावे नवी मुंबईत दडपशाही करीत असून मुख्यमंत्र्यांनी सावध रहावे, असे आवाहन देखील त्यांनी केले. नवी मुंबईतील जनता सुज्ञ असल्यामुळेच आमदारकी आणि खासदारकीच्या निवडणुकीला चौगुले यांचा दणदणीत पराभव करीत त्यांची जागा दाखवल्यामुळे शेवटी नगरसेवक म्हणून त्यांना निवडणूक लढवावी लागते, असा टोला देखील अनंत सुतार यांनी लगावला आहे. 1995 पासून नवी मुंबईतील जनतेने गणेश नाईक यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे. आम्ही सर्व एक दिलाने महायुतीचे काम करीत आहोत मात्र आमच्या नेतृत्वावर जर कोणी बिनबुडाची टीका करीत असेल तर अशा प्रवृत्तींना शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील अनंत सुतार यांनी दिला आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started