प्रतिनिधी/पालिका प्रशासन : नवी मुंबई महानगरपालिकेने 48 तासांआधी नियोजित महिला दिन कार्यक्रम रद्द केल्यामुळे, महापालिकेच्या समाज विकास विभागातील व्यवस्थापन आणि येथील अधिकारी वर्गाची निष्क्रियता तसेच या विभागाचा सावळागोंधळावर अश्या सर्वांवर शिक्कामोर्तब झाले आहे.
महानगरपालिका समाज विकास विभागाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या अंगभूत कलागुणांना उत्तेजन देणारे विविध स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित केले जातात. तर, यावर्षीच्या महिला दिनी महाशिवरात्रीची सार्वजनिक सुट्टी असल्याने महिला दिनाचा कार्यक्रम 13 मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. परंतु, काल रात्री महापालिकेने 13 तारखेचा कार्यक्रमही अपरिहार्य कारणास्तव रद्द केल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. ज्यामुळे नवी मुंबईतील महिला वर्गाचा हिरमोड झाला असून त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तर, दुसरीकडे समाजविकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त व सहाय्यक आयुक्त इत्यादी वरिष्ठ अधिकारी मंत्रालयीन नियुक्तीचे असल्याने त्यांना या शहराशी देणेघेणे नसल्यानेच महिला दिन कार्यक्रम करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे.

