1–2 minutes

प्रतिनिधी/पालिका प्रशासन : स्वच्छ सर्वेक्षण 2024 ला सामोरे जाताना नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी स्वच्छता योध्दा ही संकल्पना मांडली. या संकल्पनेअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये स्वच्छता कार्यात उल्लेखनीय सक्रिय सहभाग देणाऱ्या महाविदयालयांच्या एनएसएस पथकांना स्वच्छता योध्दा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध महाविदयालयांच्या एनएसएस पथकांच्या सहयोगाने विष्णुदास भावे नाटयगृहात संपन्न झालेल्या स्वच्छता योध्दा 2024 उपक्रमाप्रसंगी नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये स्वच्छता कार्यात सक्रिय सहभागी होणाऱ्या 35 महाविदयालयांच्या एनएसएस पथकांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे, शहर अभियंता संजय देसाई, उपायुक्त मंगला माळवे, एनएसएसचे जिल्हा समन्वयक नितीन देशमुख, सह जिल्हा समन्वयक प्रणिता भाले व सुनिता पाल उपस्थित होते.

नवी मुंबईच्या मानांकनात एनएसएस पथकांचाही महत्वाचा सहभाग असल्याचे सांगत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये एनएसएसचे विदयार्थी अधिक उत्साहाने व जोमाने सहभागी होतील असा विश्वास व्यक्त केला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता कार्याचा व स्वच्छता संदेशांचा व्यापक प्रसार होण्यासाठी महानगरपालिकेचे फेसबुक, व्टिटर, इन्स्टाग्राम असे सोशल मिडीयाचे प्लॅटफॉर्म सर्व विदयार्थ्यांनी नियमीतपणे पाहावेत, लाईक व शेअर करावेत अशी अपेक्षा विदयार्थ्यांकडून असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे एनएसएसच्या विदयार्थ्यांमार्फत आपापल्या परिसरात स्वच्छता संदेश प्रसारणाचे काम व्यापक स्वरुपात व्हावे असेही ते म्हणाले.


Design a site like this with WordPress.com
Get started