प्रतिनिधी/पालिका प्रशासन : जागतिक महिला दिन 8 मार्च रोजीचे औचित्य साधून, सिडकोतर्फे निर्मित नवी मुंबई नोड अंतर्गत येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका आणि उरण नगरपरिषद क्षेत्रातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडिया वृत्तमाध्यमांतील महिला पत्रकारांना संपूर्ण आयुष्यासाठी विमाकवच प्रदान करण्याचा निर्णय ‘न्युज मिडिया जर्नालिस्ट असोसिएशन’तर्फे घेण्यात आला आहे. अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुदिप घोलप यांनी दिली आहे.
विद्यमान परिस्थितीत वृत्तमाध्यम क्षेत्रात महिलांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढलेली आहे. ज्याचा सकारात्मक फायदा समाजातील महिला वर्गाशी संबंधित असणाऱ्या प्रश्नसमस्यां शासनदरबारी आणि राजकीय व्यासपीठावर मांडून त्या सोडवण्याकडे महिला पत्रकारांची भूमिका महत्वाची ठरत आहे. तर, वृत्तांकन करताना स्व-आरोग्याची आणि जीवनसुरक्षतेची काळजी घेणे महिला पत्रकारांसाठी तितकेच गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेता न्युज मिडिया जर्नालिस्ट असोसिएशनने महिला पत्रकारांना दरवर्षी दहा लाख रुपयांचे विमाकवच देण्याचा निर्णय फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या संघटनेच्या मासिक बैठकीत घेतला असल्याचे संघटनेच्या सचिव तथा जनता न्युजच्या उपसंपादिका फोरम जोशी यांनी सांगितले.
तर, संघटनेतर्फे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणारे हे विमाकवच सिडको नोड नवी मुंबई क्षेत्रातील सर्व प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल-ऑनलाईन मिडिया मधील महिला पत्रकार, महिला फोटो जर्नालिस्ट, महिला व्हिडीओ जर्नालिस्ट इत्यादींना विनाशुल्क संघटनेतर्फे देण्यात येणार असून, सदरहू विमा रक्कमेचा पूर्णतः आर्थिक भार न्युज मीडिया जर्नालिस्ट असोसिएशन जोपर्यंत सदर महिला ही पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत राहील, तोपर्यंत देय असणारा अशी माहिती संघटनेच्या संस्थापक सदस्या तथा ज्येष्ठ पत्रकार मनीषा ठाकूर यांनी दिली. तर, या विमाकवच योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला पत्रकारांनी संघटनेच्या सचिव फोरम जोशी (9869322175); सदस्या मनीषा ठाकूर (7718077067); अध्यक्ष सुदिप घोलप (9320304345) यांपैकी कोणालाही संपर्क साधण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे. तसेच, सर्व महिला पत्रकारांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा संघटनेतर्फे देण्यात आल्या आहेत.

