1–2 minutes

प्रकल्पांच्या वेगवान अंमलबजावणीकरिता अधिकाऱ्यांना दिले निर्देश

प्रतिनिधी/पालिका प्रशासन : सिडको महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी गुरुवार, ७ मार्च रोजी सिडकोच्या विविध प्रकल्प स्थळांना भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने व्हावी याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

या प्रसंगी शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, डॉ. कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, दिलीप ढोले, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, सुरेश मेंगडे, मुख्य दक्षता अधिकारी, सिडको, रविंद्र मानकर, मुख्य नियोजनकार (नवी मुंबई), गीता पिल्लई, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ), सिडको, शीला करुणाकरन, मुख्य अभियंता (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ), प्रभाकर फुलारी, अतिरिक्त मुख्य अभियंता, सिडको, प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको आणि प्रकल्पांशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विजय सिंघल यांनी दिनांक १ मार्च २०२४ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्प स्थळाला भेट दिली होती. त्यानंतर आज दिनांक ७ मार्च २०२४ रोजी त्यांनी एमटीएचएल उलवे जंक्शन साईट, प्रस्तावित युनिटी मॉल, भूमीपुत्र भवन, बामणडोंगरी गृहनिर्माण योजना, उलवे सागरी मार्ग कनेक्टिव्हिटी, जेएनपीए व सिडको अधिकारक्षेत्रातील कनेक्टिव्हिटी, उलवे व द्रोणागिरी नोड आणि लॉजिस्टिक्स पार्क या प्रकल्प स्थळांना भेट दिली. या भेटी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांशी प्रकल्पाच्या सद्यस्थितीविषयी चर्चा केली व प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने व्हावी याकरिता निर्देश दिले.

“सिडकोचे गृहनिर्माण, प्रस्तावित युनिटी मॉल, लॉजिस्टिक्स पार्क इ. प्रकल्प हे प्रगतीपथावर आहेत. या प्रकल्पांच्या भौतिक प्रगतीचा आढावा घेण्याकरिता प्रकल्प स्थळांना भेट देण्यात आली. सर्वसामान्य नागरिक, स्थानिक कारागीर, व्यावसायिक, प्रकल्पबाधित अशा विविध घटकांच्या हिताच्या दृष्टीने हे प्रकल्प महत्त्वाचे असल्याने या प्रकल्पांची अंमलबजावणी वेगाने व नियोजित वेळेत व्हावी याकरिता संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत.” विजय सिंघल
(उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक)


Design a site like this with WordPress.com
Get started