प्रतिनिधी/पालिका प्रशासन : ‘प्रत्येक मराठी भाषिक माणसाने समोर येणार मग तो कोणत्याही भाषेचा पुरस्कर्ता असो, त्यासोबत मराठी भाषेतूनच संवाद साधला पाहिजे” असा सल्ला वजा ईशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख तथा मराठी हृदयसम्राट राज ठाकरे यांनी दिला आहे. ते वाशी नवी मुंबईत आयोजित विश्व मराठी संमेलन-२०२४ याठिकाणी बोलत होते.
पुढे विचार मांडताना राज ठाकरे बोलले की, अमेरिकेत मराठी भाषा शाळा सुरू होत असून, महाराष्ट्रात मात्र मराठी शाळा बंद पडू नये म्हणून लढा द्यावा लागतो, तर महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे राज्य शासनाने अनिवार्य करा, बाकी त्या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आम्ही पाहून घेवू, असे विधान राज ठाकरे यांनी करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
तर, याप्रसंगी उपस्थित शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी येत्या शैक्षणिक वर्षात सर्व शाळांसाठी मराठी भाषा शिकवणे अनिवार्य केली असल्याची माहिती दिली ज्यावर, राज ठाकरे यांनी “शिक्षकही व्यवस्थित ठेवा, अन्यथा त्रास होतो’ असा राजकीय चिमटाही उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता काढला.
तर, हिंदी ही फक्त केंद्र आणि राज्य यामध्ये संवाद साधण्यासाठीची प्रशासकीय मान्यताप्राप्त भाषा असून, ती राष्ट्रीत भाषा नसल्याचे पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी गुजरात हायकोर्टाच्या निकालाचा हवाला देत अधोरेखित केले. तसेच, जर पंतप्रधान आपल्या स्व-राज्याची भाषा, संस्कृती आंतरराष्ट्रीय पाहुण्यांना दाखवून त्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील असतील तर आपण का मागे पडायचे? असा सवाल ही ठाकरे यांनी उपस्थित केला.


