1–2 minutes

नवी मुंबई/पालिका प्रशासन : आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जाणीव पूर्वक भगवान श्रीराम यांच्या आहाराविषयी विकृत वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी नवी मुंबई विश्व हिंदु परिषदेच्या वतीने सीबीडी पोलीस ठाण्यात एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बेलापुर प्रखंड मंत्री स्वरूप पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, मुंब्रा मतदार संघाचे राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात श्रीरामांबद्दल एकेरी उल्लेख केला आहे.यामध्ये त्यांनी प्रभूच्या आहार, वनवास यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. श्रीरामांनी वनवासाला निघताना फळे, मध, व कंदमुळे यांवर आपले जीवन निर्वाह करेन असा संकल्प केला. मग ते वनवासासाठी बाहेर पडले. असे असतांनाही कुठलाही अभ्यास नसताना हिंदू समाजात जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आव्हाड हे करत आहेत. याबरोबर त्यांनी वेदांचाही अवमान केला आहे. २२ जानेवारीला श्री रामलला भव्य मंदिरात विराजमान होणार असून सर्व भारतीयांचे व जगाचे लक्ष या सोहळ्याकडे लागले आहे. हिंदू समाजाचा हा अविस्मरणीय वंद्य सोहळा असणार आहे. सर्व जगातील अतिशय महत्वाचे व्यक्ति या पवित्र सोहळ्यास उपस्थित असणार आहेत. या सर्व काळात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देशात जातीय दंगली घडवून आणण्याचा कट रचला असावा अशी शंका येते. त्यामुळे आव्हाड यांच्यावर भारतीय दंड संहिता १५३ अ, २९५ अ यानुसार गुन्हा नोंद करण्यात यावा आणि त्यांना त्वरीत अटक करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started