1–2 minutes

प्रतिनिधी/पालिका प्रशासन : नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरुळ विभागातील वंडर्स पार्कमधील राईडमध्ये बसण्यासाठी तिकीट काऊंटर बंद झाल्यावर नागरिकांना आता काळजी करण्याची गरज नसून, राईडचे ऑपरेटरला रोख अथवा ऑनलाईन शुल्क दिल्यावर राईडमध्ये बेकायदेशीरपणे का होईना, बसता येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये, सदर पार्कचा देखभाल-दुरुस्तीचे कंत्राट दिलेला कंत्राटदार आणि आर्थिकदृष्ट्या हात ओले करायला मिळतात म्ह्णून, उद्यान विभागाचे काही अधिकाऱ्यांचा या भ्रष्ट कारभाराला हातभार असल्याचे सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार दिसून येत आहे.

कोरोना काळापासून वंडर पार्क बंद होते. त्यानंतर या पार्कच्या डागडुजीसाठी आणि सुशोभीकरणासाठी, २७ कोटीपेक्षा अधिक रुपये खर्चून, पार्क नव्याने सुरू करण्यात आले आहे. १ जून २०२३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पार्कमधील सेवासुविधांचे लोकार्पण करण्यात आले. तर, देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधींची उलाढाल असणाऱ्या या पार्कमध्ये विविध प्रकारचे राईडस उपलब्ध आहेत. ज्यामध्ये बसण्यासाठी प्रवेश करतानाच राईडसचे शुल्क भरून तिकीट मिळते. 

मात्र, प्रवेश शुल्क कार्यालय संध्याकाळी सात वाजता बंद होते. तदनंतरही बहुतांश नागरिक पार्कच्या आतमध्येच असतात आणि राईडचा आनंद घेण्यासाठी राईड ऑपरेटरला थेट रक्कम देऊन राईडचा आनंद घेतात. सदरची रक्कम कंत्राटदार ऑपरेटरच्या खिशात जात असून दिवसागणिक किमान ५ ते १० हजार रुपये अश्या गैरपद्धतीने कमावले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे, गैरपद्धतीने आर्थिक कमाई करणाऱ्यांवर महापालिकेचा उद्यान विभाग कारवाई करणार का? याबाबत, पार्कच्या कार्यप्रणाली नियंत्रणाची जबाबदारी असणारे उद्यान विभागाचे प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत तायडे यांना विचारले असता त्यांनी माहिती घेवून कळवतो अशी प्रतिक्रिया दिली.


Design a site like this with WordPress.com
Get started