1–2 minutes

प्रतिनिधी/पालिका प्रशासन : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई शिवसेना महिला जिल्हाप्रमुख तथा प्रथम महिला विरोधीपक्ष नेता सरोज रोहिदास पाटील आणि सप्तकन्या सेवाभावी संस्थेतर्फे माध्यम क्षेत्रातील सावित्री अर्थात महिला पत्रकारांचा यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला. याप्रसंगी, उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा उल्लेखही सरोज पाटील यांनी करून, मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले.

तत्कालीन पुरुषप्रधान व्यवस्थेशी परिणामांचा विचार न करता थेट संघर्ष करून स्त्री शिक्षणाचे दरवाजे कायमस्वरूपी उघडणाऱ्या ज्ञानज्योती – क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्यामुळे आज महिलांनी सामाजिक, राजकीय, क्रीडा, वैद्यकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक व इतर मौल्यवान क्षेत्रांमध्ये मोठ्याप्रमाणात यश संपादन केले आहे आणि करत आहे. तर, माध्यम क्षेत्रातील महिलांचा सहभाग म्हणजे समाजातील शेवटच्या घटकाचा आवाज आहे. त्यामुळे, माध्यमातील महिलांचे योगदानही वाखण्याजोगे आहे. ज्याचा सन्मान सत्कार नवी मुंबई शिवसेना आणि सप्तकन्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून करून सावित्रीमाई फुले यांना मानवंदना करत असल्याचे मत जिल्हाप्रमुख सरोज रोहिदास पाटील यांनी व्यक्त केले. तसेच, ज्ञानज्योती सावित्रींच्या पाठीमागे प्रोत्साहनासाठी ज्याप्रमाणे एक ज्योतिबा होते तसेच माझ्यापाठीमागे माझे पतीश्री उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील खंबीरपणे उभे असतात, असे गैरवोद्गार सरोज पाटील यांनी केले.
यावेळी, पत्रकार सर्वस्वी मनीषा ठाकूर (महाराष्ट्र टाईम्स), स्वाती नाईक (झी चोवीस तास), स्वप्ना हरळकर (आकाशवाणी), शुभांगी पाटील (सकाळ), मोनिका भोसले (नवी मुंबई नेटवर्क), प्रिया भुजबळ (आवाज टुडे), कविता म्हात्रे (जय महाराष्ट्र), फोरम जोशी (पालिका प्रशासन/जनता न्यूज) इत्यादी महिला पत्रकारांचा सत्कार सन्मान करण्यात आला. तर, सप्तकन्या सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सरोज पाटील यांच्यासमवेत, सचिव गीता पाटील, खजिनदार  जयश्री शिंदे, सदस्य सर्वस्वी श्वेता पवार, विनोदिनी पाटील, लतिका सावंत, साधना कातकरी, नीलम रोकडे आणि दीक्षा गायकवाड उपस्थित होते.


Design a site like this with WordPress.com
Get started