प्रतिनिधी/पालिका प्रशासन : भारतीय जनता पार्टी ने ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक जाहीरनामा तयार करण्यासाठी नागरिकांकडून सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आज नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आयोजित पत्रकार परिषदेतून या संदर्भातील पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले आणि संयुक्तपणे नागरिकांना या संदर्भात आवाहनही करण्यात आले. माजी खासदार व ठाणे लोकसभेचे संयोजक विनय सहस्रबुद्धे, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, जिल्हा महामंत्री सर्वस्वी अनंत सुतार, शशिकांत राऊत, बेलापूर विधानसभा निवडणूक प्रमुख निलेश म्हात्रे, नेत्रा शिर्के, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार, प्रदेश आय.टी. सेल संयोजक सतीश निकम, बेलापूर विधानसभा विस्तारक अरुण पडते, इतर प्रमुख नेत्यांसह त्या त्या वार्ताहर परिषदेस उपस्थित होते.
लोकसभा संयोजक विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले की ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर ही शहरे आता मुंबईची उपग्रह शहरे राहिलेली नाहीत. त्यांची त्यांची स्वतः ची एक ओळख आहेच आणि मुंबई शहराचा रुबाब आणि झळाळी अनेक संदर्भात या तिन्ही शहरांवर अवलंबून आहे. शिवाय मुंबईचा विकास आता दक्षिणेकडून उत्तरेकडे सुरू आहे ही गोष्ट वांद्रा-कुर्ला कॉम्लेक्स च्या विकासामुळे सिद्ध झाली आहे. त्या दृष्टीने मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणानेही आता ठाणे- नवी मुंबई – मीरा-भाईंदर च्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. त्याच दृष्टीने मुंबई आणि ठाणे, नवी मुंबई व मीरा-भाईंदरचे परस्परावलंबित्व लक्षात घेऊन अमृतकाळातील ठाणे लोकसभा क्षेत्राच्या विकासाचा विचार व्हायला हवा असे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी http://www.thaneloksabha.in या पोर्टल चे उद्घाटन आणि सादरीकरण करण्यात आले. ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर या तिन्ही शहरांचा या ठिकाणच्या उद्योगांमुळे एक जागतिक महत्त्व आहेच पण हे महत्त्व या तिन्ही शहरांच्या संरचनात्मक आणि सांस्कृतिक विकासाशी ही निगडित आहे. त्या मुळेच या तिन्ही शहरातील नागरिकांनी आपले विचार, अभिनव सूचना आणि आपली शहर विकासाची दृष्टी भाजपाच्या या पोर्टल द्वारे मांडावी जेणेकरून लोकतांत्रिक पद्धतीने आणि सर्वसमावेशी विचार करुन पक्षाला आपला ठाणे लोकसभेचा जाहीरनामा तयार करता येईल असे आवाहन उपस्थित नेत्यांनी यावेळी केले.

