प्रतिनिधी/पालिका प्रशासन : विद्यार्थ्यांच्या मनातील दहावीच्या परीक्षेची भीती दूर करून दहावीच्या मुख्य परीक्षेत त्यांच्या निकालाची टक्केवारी वाढविणारी श्री. गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे एसएससी बोर्डाच्या धर्तीवर आयोजित श्री. गणेशजी नाईक एसएससी सराव परीक्षेचा शुभारंभ 6 जानेवारी 2023 रोजी दुपारी दीड वाजता तेरणा मेडिकल डेंटल कॉलेज ऑडिटोरियम, सेक्टर 22 नेरूळ येथे होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक आणि सचिव तथा नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दिली आहे.
दरवर्षी दहा ते पंधरा लाख विद्यार्थी एसएससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेला सामोरे जात असतात. या परीक्षेचे महत्त्व पाहता एक प्रकारचे दडपण आणि भीती बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या मनात असते. त्यामुळे त्यांच्या मनातील ही भीती नाहीशी करून आत्मविश्वास भरण्यासाठी आम्ही एसएससी सराव परीक्षेचा उपक्रम लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या प्रेरणेने सुरू केला. 25 वर्षांपूर्वी म्हणजेच 1998 साली एसएससी सराव परीक्षेची सुरुवात ऐरोली येथे झाली. सुरुवातीला दोनच केंद्रे होती. साधारणपणे 500 ते 600 विद्यार्थी परीक्षेला बसायचे. आज या परीक्षेला दरवर्षी सरासरी नऊ ते दहा हजाराच्या दरम्यान विद्यार्थी बसतात.
आतापर्यंत दीड लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेचा लाभ घेऊन मुख्य परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. यावर्षी 6 जानेवारी 2024 ते 21 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये सराव परीक्षा पार पडणार आहे. यावर्षी 9900 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नावनोंदणी केली आहे. नवी मुंबईतील सर्वच विभागातून तब्बल 85 शाळांचा यावर्षी सहभाग असणार आहे.
महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमध्ये आयोजित होणाऱ्या एसएससी सराव परीक्षा या एक किंवा दोन भाषा माध्यमातून होतात परंतु नवी मुंबईतील सराव परीक्षा मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषा माध्यमातून घेतली जाते. एसएससी बोर्डप्रमाणे हॉलतिकीट, परीक्षा केंद्रे, प्रश्नपत्रिका तयार करणे आणि त्या तपासणे अशी सर्व कामे तज्ञ शिक्षकांमार्फत केली जातात. अशाप्रकारे व्यापक स्वरूपात सराव परीक्षेचा हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम असावा. एसएससी सराव परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत येणारे विद्यार्थी मुख्य परीक्षेत देखील गुणवत्ता यादीमध्ये झळकतात हा आजवरचा अनुभव आहे.
या सराव परीक्षेच्या माध्यमातून मुख्य परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांना विषयानुरूप ते कुठे कमी पडत आहेत, उत्तरांमधील त्रुटी किंवा उनिवा काय आहेत, या बाबी समजतात. त्यामध्ये विद्यार्थी सुधारणा करतात. आणि अधिक आत्मविश्वासाने मुख्य परीक्षेला सामोरे जाऊन यश संपादित करतात.
एसएससी सराव परीक्षेमुळे नवी मुंबईच्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची टक्केवारी देखील वाढल्याचे शिक्षक सांगतात. बघता-बघता एसएससी सराव परीक्षा उपक्रमाने रौप्य महोत्सवी पंचविसाव्या वर्षात पदार्पण केले आहे. याचा आम्हाला विशेष आनंद असल्याचे प्रतिपादन संदीप नाईक यांनी केले.
या उपक्रमाच्या सफलतेसाठी परिश्रम करणारे श्री गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व सदस्य, पदाधिकारी, नवी मुंबईतील विविध शाळा, विद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक, स्वयंसेवक अशा सर्व घटकांना सहकार्यासाठी संदीप नाईक यांनी धन्यवाद दिले.
शैक्षणिक क्यू आर कोडचे वितरण..
श्री गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना विनामूल्य शैक्षणिक क्यू आर कोड भेट देण्यात येणार आहे. या कोडमध्ये शैक्षणिक व्हिडिओ असणार आहेत.
उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही संधी
परिस्थिती अथवा काही कारणास्तव विद्यार्थ्यांना सराव परीक्षेसाठी वेळेवर नावनोंदणी करता आली नाही. किंवा विद्यार्थी उशिराने नाव नोंदणीसाठी आले तरी त्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे त्यांच्यासाठी ट्रस्टच्या वतीने नाव नोंदणीसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना सराव परीक्षेसाठी नाव नोंदणी करायची आहे. त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. 9221267801/9920028525/ 8369977125

