प्रतिनिधी/पालिका प्रशासन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी, नवी मुंबईतील दोन्ही विधानसभांवरील दावा सैल होताना दिसत आहे. तर, मुख्यमंत्र्यांकडून कोणत्याही प्रकारची तयारी सुरु करण्याचा आदेश आला नसल्याने, आमदारकीसाठी उत्सुक असणारे इच्छुक उमेदवार आप-आपल्या वॉर्डात आणि उद्योगव्यवसायात मग्न आहेत. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकीत बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या युतीत नवी मुंबईतील दोन विधानसभा मतदार संघांपैकी एक मतदार संघ नैसर्गिक नियमानुसार शिंदे गटाला मिळणे अपरिहार्य आहे. मात्र, विधानसभा लढविण्यासाठी ठाण्यातून कोणताही स्पष्ट आदेश नसल्याने येथील नेतेमंडळी शांत मनस्थितीत आहेत. तर, दुसरीकडे भाजपच्या बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे, ऐरोलीचे आमदार गणेश नाईक हे नागरी मुद्दे उचलून आणि जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वात भाजपडून विविध आंदोलने घेत दोन्ही मतदार संघांवर पकड घट्ट करण्याकडे पक्ष प्रयत्नशील आहे.
शिंदे गटाकडून बेलापूर विधानसभा क्षेत्रासाठी आधी विजय नाहटा उत्सुक होते. मात्र, आताची त्यांची भुमिका व सक्रियता बघितल्यास आमदारकी लढण्यास ते उत्सुक नसल्याचे दिसून येते. तर, तुर्भे स्टोअरचे मातब्बर नेते म्हणून ओळख असणारे उपजिल्हाप्रमुख तथा मा.ज्येष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी आणि महिला जिल्हासंघटक तथा मा.ज्येष्ठ नगरसेविका सरोज रोहिदास पाटील हे बेलापूर मतदार संघातून निवडणूक लढण्यास उत्सूक आहेत. परंतु, ठाण्यातून तयारीचे स्पष्ट संकेत नसल्याने, यांनीही मौन बाळगण्यात धन्यता मानली आहे.
ऐरोली विधानसभा जागावाटपात थेट भाजपकडे जाण्याची १००% शक्यता आहे. त्यामुळे, येथून कोणीही , कितीही ‘विजया’साठीच्या गप्पा हाणल्या अथवा मतदार संघात राजकीय क्लेश घडवून स्वतःचे अस्तित्व असल्याचा दावा करण्याचा प्रयत्न केला. तरीही, शिंदे गटाच्या कोणत्याही नेत्याला ऐरोलीतून उमेदवारी मिळण्याची सुतराम शक्यता नसल्याचे माहीत असल्यानेच या मतदार संघात शिंदे गटातील नेत्यांकडून कोणताच प्रयत्न होताना दिसत नाहीए.
तसेच ठाणे लोकसभा मतदारसंघासाठीही भाजपकडूनच उमेदवार दिला जाणार हि ‘काळ्या दगडावरील, पांढरी रेघ आहे’ त्यामुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुका लढविण्यासाठी नवी मुंबईतील त्यांच्या शिलेदारांना स्पष्टता न दाखवल्यास, विधानसभा मतदार संघासोबतच २०२५च्या महानगरपालिका निवडणुकीतही शिंदे गटाची घसरण नक्की आहे.

