प्रतिनिधी/पालिका प्रशासन : नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तपदी पुन्हा राहुल गेठे यांची नेमणूक केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत आल्यानंतर उपायुक्त राहुल गेठे यांनी बड्या अतिक्रमणधारकांवर जोरदार कारवाई केली होती. त्यामुळे सर्वच लहान- मोठ्या अतिक्रमणधारकांचे चांगलेच धाबे दणाणले होते. यामध्ये काही नाराज घटकांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत गेठे यांची तक्रार केली होती. परिणामी गेठे यांची मालमत्ता विभागाचे उपायुक्तपदी बदली करण्यात आली होती. वातावरण शांत झाल्यानंतर पुन्हा गेठे यांना अतिक्रमण पदाचा पदभार देण्यात येणार होता अशी चर्चा त्याचवेळी होती.
त्यानुसार, शुक्रवारी (2 December) शिक्षण विभागाचे उपायुक्त दत्तात्रेय घनवट यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्यामुळे ते पुन्हा मंत्रालयात गेले. त्यानंतर संध्याकाळी उशिराने त्यांच्या जागी उपायुक्त योगेश कडूसकर यांना एन एम एम टी सह शिक्षण विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तसेच राहुल गेठे यांच्याकडे मालमत्ता विभागासह अतिक्रमण विभागाचा पदभार सोपवण्यात आला आहे. आता राहुल गेठे पूर्वीप्रमाणेच भूमाफिया आणि अतिक्रमण करणारे बडे व्यावसायिक (हॉटेल,लॉज) यांच्यावर कारवाईचा बुलडोझर चालवतात की शांत राहण्याची भूमिका घेतात हे पहावे लागेल

