नवी मुंबई/पालिका प्रशासन : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड मधील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या प्रचंड महाविजयाचा महा जल्लोष आज नवी मुंबई भाजपाच्यावतीने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरा करण्यात आला.
नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली हा जल्लोष साजरा झाला. माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, भाजपा आयटी सेलचे प्रमुख सतीश निकम, महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती संपत शेवाळे, माजी स्थायी समिती सभापती नवीन गवते, नवी मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष माधुरी सुतार, युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित मेढकर, उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष राजेश राय, लोकसभा विस्तारक अरुण पडते, माजी नगरसेवक सर्वश्री शशिकांत राऊत, लीलाधर नाईक, प्रकाश मोरे, अंजली वाळुंज, सुरेश शेट्टी, वैशाली नाईक, उषा भोईर, शुभांगी पाटील, शशिकला पाटील, भारती पाटील, रविकांत पाटील, सायली शिंदे, राजेश शिंदे, कृष्णा पाटील, पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या जल्लोषात सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या विजयाच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. वंदे मातरम आणि भारत माता की जय तसेच जय श्रीराम च्या घोषणा दुमदुमल्या. मिठाई एकमेकांना वाटून विजयाचा आनंद गोड करण्यात आला. वाद्यांच्या तालावर ठेका धरत यावेळी कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.
भाजपाच्या या महाविजयाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी देशातील जनतेचा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली या देशाचा यापुढेही विकास व्हावा हाच कौल जनतेने या निवडणूक निकालामध्ये दिला असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढेही भाजपाच्या विजयाची घोडदौड अशीच सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांमध्ये मोठ्या फरकाने भाजपाचा विजय झाल्याचे सांगून आगामी लोकसभा निवडणुकीची पाच राज्यांची निवडणूक ही सेमी फायनल असेल, काटे की टक्कर होईल असे भाकीत वर्तविण्यात आले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने विरोधकांना चारी मुंड्या चित केल्याचे जिल्हाध्यक्ष नाईक म्हणाले. केंद्रातील भाजपा सरकारने देशातील सर्वच राज्यांच्या विकासाला पाठबळ दिले आहे. सर्व घटकांसाठी कल्याणाच्या योजना राबविल्या आहेत. यह तो झाकी है… असे सांगत त्यांनी आगामी लोकसभेमध्ये देखील भाजपाचा विक्रमी विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला. नवी मुंबई आणि ठाण्यातील निवडणुकांमध्ये देखील भाजपाचीच सत्ता येईल.


