प्रतिनिधी/पालिका प्रशासन : दिवसेंदिवस बांधकाम व्यवसायिकांकडून ग्राहकांच्या फसवणूकीची प्रकरणे कानावर ऐकू येतात. ज्यापैकी, काही दाबली जातात तर काही पोलिसांकडे दाखल होतात. परंतु, पैशांचा माज चढलेल्या फ्रॉड बिल्डर अथवा त्याच्या व्यवसायावर कोणत्याच प्रकारचा परिणाम होत नाही. मात्र, फसवणूक झालेल्या ग्राहकाच्या माथी न्यायालयाच्या फेऱ्यांची पणवती मागे लागते. त्यामुळे, अश्या फ्रॉड बिल्डरांकडून ग्राहकांची फसवणूक होवू नये. म्हणून, पोलिसांनीच पुढाकार घेऊन ज्या बिल्डरांवर व्यवसायिक संबंधित गैरव्यवहारप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल आहेत तसेच सदर प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत. अश्या फ्रॉड बिल्डर व बिल्डर कंपन्यांची यादी जाहीररीत्या प्रसिद्ध करावी.
येत्या काही दिवसांमध्ये सालाबादप्रमाणे नवी मुंबई पोलीस क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या बांधकाम व्यवसायिक आणि बांधकाम कंपन्यांच्या माध्यमातून मालमत्ता प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तर, बांधकाम प्रकल्प उभारताना बहुतांश बांधकाम व्यवसायिक/बांधकाम कंपन्यांकडून केंद्र व राज्य शासन नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे सर्वश्रुत आहे. तसेच, एकच मालमत्ता एकापेक्षा अधिकांना विकणे, बांधकामास बांधणीचे प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र, कम्प्लिशन प्रमाणपत्र नसताना मालमत्तेचा व्यवहार करणे, करारात लिखित विहित वेळेत मालमत्ता ग्राहकास हस्तांतरित न करणे अश्या व तत्सम गुन्ह्यांबाबत पोलीस विभागाच्या विविध पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल असतात.
तरी, वर नमूद मालमत्ता व्यवहार संबंधित/तत्सम गुन्हे दाखल असणाऱ्या बांधकाम व्यवसायिक आणि बांधकाम आस्थापनांची नावे नवी मुंबई पोलीस कार्यक्षेत्रात आयोजित करण्यात येणाऱ्या मालमत्ता प्रदर्शनाच्या ठिकाणी सार्वजनिक स्वरूपात प्रसिद्ध करून जनजागृती करावी. जेणेकरून मालमत्ता खरेदी करणाऱ्या ग्राहकांची बांधकाम व्यवसायिकांकडून आर्थिक फसवणूक होण्यास पायबंद बसण्याकडे एक सकारात्मक जनविधेयक पाऊल असेल.

