प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : नवी मुंबई ला नियोजित शहर असे म्हटले जात असले तरी युटिलिटी डक्ट च्या बाबतीतील पालिकेच्या उदासीन धोरणांमुळे वर्तमानात जो संपूर्ण नवी मुंबई शहरात सीसीटीव्ही प्रोजेक्ट राबवला जात आहे त्याच्या केबल्स थेट गटारीतून टाकण्याची वेळ पालिकेवर आलेली दिसते.
कॉ . भाऊ पाटील चौकात सीसीटीव्ही साठीच्या केबल्स थेट गटारीतूनच टाकल्याचे दिसते . त्याच बरोबर सुस्थितीतील रोड ची देखील खुदाई केलेली आहे . संपूर्ण शहरात अशाच प्रकारे डिव्हायडर , गटारी व रोड खोदून केबल्स टाकल्या जात आहेत. वस्तुतः गटारी तून केबल्स टाकणे अत्यंत चुकीचे आहे पण फायबर केबल्सला पाण्याच्या प्रवाहामुळे काही होत नाही म्हणून आम्ही गटारीतून टाकत असल्याचे कामाच्या ठिकाणी असणाऱ्या सुपरवायजर ने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. डीव्हायडर मध्ये झाडे लावली जातात त्याच डिव्हायडर मधून केबल्स टाकल्या जात आहेत व त्यावर सिमेंटचा लेप लावला जातो आहे . एकुणातच आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था पालिका प्रशासनाच्या बाबतीत झालेली दिसते.
नवी मुंबईतील अनेक सजग नागरिक ,सामाजिक संस्था, अलर्ट सिटिझन्स फोरम वारंवार पालिका प्रशासनाकडे रस्ता तिथे युटिलिटी डक्ट सुविधा प्रकल्प राबवण्यासाठी पाठपुरावा करत असून देखील पालिका प्रशासन मात्र अर्थपूर्ण रीतीने त्याकडे दुर्लक्ष करते आहे. एवढेच नव्हे तर अलर्ट सिटिझन्स फोरमने राष्ट्रीय संपत्ती असणाऱ्या रस्त्यांची वारंवार केल्या जाणाऱ्या खुदाई मुळे हानी होते आहे या कारणास्तव पालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल करा अशा प्रकारची मागणी पोलीस आयुक्तांकडे देखील केलेली होती. तरी देखील प्रशासनाला जाग आलेली दिसत नाही. भविष्यात नवी मुंबई हे नियोजित शहर आहे असा दावा करण्यापूर्वी पालिका प्रशासनाने नवी मुंबईत एकूण किती किमी चे रस्ते आहेत व त्या पैकी किती किमी रस्त्यांवर विविध प्रकारच्या केबल्स टाकण्यासाठी रस्त्यांच्या जमिनीखाली भुयारी वाहिन्या आहेत याची माहिती जनतेसमोर मांडावी .

