प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सिडकोकडून ट्रस्टच्या नावखाली कवडीमोल दराने जमीन घेवून त्यावर आर्थिक फायद्यासाठी शाळा – कॉलेजेस उभारून त्यासाठीच्या आरक्षित क्रीडा मैदानावर बंदिस्त टर्फची बेकायदेशीर तथा अनधिकृत उभारणी करून, त्यातूनही अर्थप्राप्ती करणाऱ्याच्या ढोंगी राजकारणी तथा स्वयंघोषित शिक्षणसम्राटांच्या विरोधात ‘मनसे’ विद्यार्थ्यांनी पुकारलेले आंदोलन ‘मॅनेज’ झाले आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तत्कालीन सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी असल्याचा गैरवापर करून किंबहुना तसा सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव टाकून, सामाजिक संस्थेच्या नावाखाली जनकल्याणासाठी सिडकोकडून कवडीमोल दराने मोक्याच्या ठिकाणचा भूखंड मिळवून त्यावर ‘अर्थजना’साठी व काळ्याचे सफेद करण्यासाठी शैक्षणिक संस्थेची उभारणी करण्याचा गोरख धंदा सर्विकडे राजरोसपणे सुरू आहे.
तसेच, या शिक्षण संस्थेचे क्रीडा मैदान शाळेच्या वेळेखेरीज आणि सुट्टीच्या दिवशी स्थानिकांना / खेळाडूंना उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. तसेच सदर मैदानावर कोणत्याही प्रकारचे अनधिकृत/बेकायदेशीर बांधकाम अथवा लोखंडी स्ट्रक्चर उभारण्यास पूर्णतः बंदी आहे. परंतु, नवी मुंबईतील बहुतांश शिक्षण संस्थांनी हा नियम धाब्यावर बसविला आहे
याविरोधात ‘मनसे’ लेटरबाजी करून सदर अतिक्रमण विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. परंतु, एक वर्षाहून अधिक कालावधी लोटूनही मैदानावर उभारण्यात आलेल्या अतिक्रमित टर्फवर कसुभरही कारवाई झालेली नाही व ‘मनसे’ शांतता आहे. त्यामुळे, स्वयंघोषित शिक्षणसाम्राटांकडून ‘मनसे’आंदोलन ‘मॅनेज’ झाले की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

