बीसिटी विधी महाविद्यालयात न्यायालयीन परीक्षा तयारी परिसंवाद संपन्न
प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : न्यायधीश होण्यासाठीची जिद्द व लक्ष्य बाळगताना प्रारंभीपासूनच न्यायव्यवस्थेचा संबंधित सखोल अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळणार असा मार्गदर्शत्वकी विश्वास ऍड. डॉ. राजेंद्र अनभुले यांनी व्यक्त केला. ते खांदा कॉलनी येथील भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयात न्यायालयीन परीक्षेची तयारी या विषयावर आयोजित परिसंवादात मार्गदर्शन्वये बोलत होते.
भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयात न्यायालयीन परीक्षेच्या तयारी करता अत्यंत माहितीपूर्ण आणि आकर्षक परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम प्रभारी प्राचार्य सानवी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बीए एलएलबी समन्वयक आणि स्पर्धा परीक्षा केंद्र बीसिटी महाविद्यालय समन्वयक धनश्री कदम यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून लाभलेले डॉ. राजेंद्र दत्तात्रय अनभुले वकील सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांनी अमूल्य मार्गदर्शन केले.
डॉ. राजेंद्र अनभुले यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये न्यायालयीन परीक्षा प्रक्रियेवर प्रकाश टाकला. अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, अभ्यासातील सुसंगतता, संलग्नता, या गोष्टी सांभाळल्यास न्यायाधीश होणे शक्य असल्याचे त्यांनी संबोधित केले. सुरुवातीपासूनच सखोल अभ्यास केल्यास यश नक्की मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली. अभ्यास करण्याकरता विद्यार्थ्याना काही विशेष सूचना ही देण्यात आल्या. तर, कार्यक्रमास विशेष उपस्थिती लाभलेले मुंबई उच्च न्यायालय वकील मंगेश वाकळे सर यांनीही विद्यार्थ्यांना विशेष मोलाचे मार्गदर्शन केले.
या परिसंवादाचे सूत्रसंचालन भक्ती शिंदे यांनी केले. तर, अतिथी परिचय विद्यार्थिनी श्रावणी मोकल यांनी केला. हा कार्यक्रम महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या भरघोस प्रतिसादामध्ये या कार्यक्रमाची सांगता गायत्री गोखले यांनी केली.

