1–2 minutes

प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : नवी मुंबई भारतीय जनता पक्ष आणि गणेशजी नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी आठव्या भव्य महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सानपाडा सेक्टर 2 मधील सौराष्ट्र पटेल सभागृहामध्ये हा महारोजगार मेळावा सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत पार पडणार आहे, अशी माहिती महारोजगार मेळाव्याचे आयोजक नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दिली आहे. लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या प्रेरणेने हा लोकोपयोगी उपक्रम सुरु करण्यात आला आहे. महारोजगार मेळाव्यात स्थानिक कंपन्यांमधून स्थानिक बेरोजगार उमेदवारांना नोकरी मिळत असल्याने या कंपन्यांमध्ये उमेदवार टिकण्याची टक्केवारी देखील वाढली आहे.

बीपीओ, केपीओ, आयटी, फॅसिलिटी मॅनेजमेंट, फिनान्स, इन्शुरन्स, सिक्युरिटी, उत्पादन, टयुटोरियल्स, इंजिनिअरिंग, फूड, रिटेल, कम्प्युटर हार्डवेअर ऍन्ड नेटवर्कींग, हॉस्पिटल्स, सेल्स ऍन्ड मार्केटींग, हॉटेल इंडस्ट्री इत्यादी क्षेत्रातील अनेक कंपन्यांमधील रोजगाराच्या संधी या रोजगार मेळाव्यात उमेदवारांसाठी उपलब्ध होणार आहेत. जानेवारी २०१२ पासून या महा रोजगार मेळाव्याचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. या मेळाव्यात सहभागी कंपन्या आणि उमेदवारांची संख्या वाढते आहे. महारोजगार मेळाव्यामधून आतापर्यंत हजारो उमेदवारांना त्यांच्या स्वप्नातील रोजगार मिळाला होता. केवळ सदृढ उमेदवारांनाच नव्हे तर दिव्यांग उमेदवारांना देखील या मेळाव्यामधून रोजगाराचा आधार मिळाला आहे. यावर्षी या मेळाव्यात विविध क्षेत्रातील ५०० कंपन्यांची नोंदणी झाली आहे. या वर्षीच्या मेळाव्यात देखील यशस्वी मुलाखतीसाठी मार्गदर्शन सेमिनार होणार आहे. मेळाव्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना लगेचच नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. जे उमेदवार काही कारणास्तव रोजगार मिळविण्यास पात्र ठरणार नाहीत त्यांना जॉब मिळण्यासाठी मार्गदर्शन करुन रोजगार मिळविण्यास मदत केली जाणार आहे.

ज्या उमेदवारांना या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी दिलेल्या स्क्यानरमध्ये आपली माहिती भरायची आहे. आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत. मेळाव्यासाठी प्रवेश मोफत आहे. महारोजगार मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी ८२९१४२४०४९ किंवा ९२२१२६७८०१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महारोजगार रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त बेरोजगार तरुण-तरुणींनी लाभ घ्यावा, असे आवाहन मेळाव्याचे आयोजक तथा नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संदीप नाईक यांनी केले
आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started