नवी मुंबई (पालिका प्रशासन) : जनतेच्या हिताच्या विरोधात काम होत असेल तर नाईलाजास्तव महापालिकेला घेराव घालावा लागेल, असा इशारा आज (दि. १९ ) लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासोबत लोकनेते नाईक यांची पालिका मुख्यालयात नियमित बैठक झाली. त्याप्रसंगी त्यांनी पालिका प्रशासनाला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली.
या बैठकीस माजी खासदार डॉ. संजीव नाईक, मा. महापौर सागर नाईक, मा. महापौर सुधाकर सोनावणे, मा. स्थायी समितीचे सभापती डॉक्टर जयाजी नाथ, मा. सभागृहनेते रवींद्र इथापे, मा. स्थायी समितीचे सभापती अनंत सुतार, मा. स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील, मा. स्थायी समितीच्या सभापती नेत्रा शिर्के, मा. सभापती सुरज पाटील, मा. स्थायी समितीचे सभापती संपत शेवाळे, मा. नगरसेविका अपर्णा गवते, माजी नगरसेविका उषा भोईर, मा. नगरसेवक विनोद म्हात्रे, मा. नगरसेवक अमित मेढकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
जून २०२३ मध्ये लोकनेते आमदार नाईक यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर नवी मुंबईतील विविध प्रलंबित प्रश्नांवर उच्स्तरीय बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झाली होती. लोकनेते नाईक यांनी मागणी केल्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी सिडको आणि एमआयडिसीकडून महापालिकेने सुविधा भूखंड प्राप्त करून घेण्याचे निर्देश दिले होते. या अनुषंगाने समाधानकारक कार्यवाही झाली नसल्याचे लोकनेते नाईक यांची आयुक्तांच्या निदर्शनास आणले. एमआयडिसीने सर्विस रोडच्या कडेला चुकीच्या पद्धतीने भूखंडांचे वाटप केले आहे. ते तात्काळ रद्द करून ज्यांना भूखंड दिले आहेत. त्यांना मोबदला देत हे भूखंड मोकळे करण्याची कारवाई तातडीने करण्याची मागणी केली. सुविधांचे भूखंड न विकता त्यावर सामाजिक सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत, असे लोकनेते नाईक यांनी स्पष्ट केले.
काही घटकांच्या दहशतीखाली कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जाते. हेच घटक नंतर पाणी टंचाईची तक्रार करतात. आणि पाणीपुरवठा सुरळीत केला जातो. पाण्याचे राजकारण चालू देणार नाही. सर्वांना पाणी मिळालेच पाहिजे, असा इशारा त्यांनी दिला. घणसोली येथील फोर्टी प्लसचे मैदान खेळासाठीच राहिले पाहिजे. बिल्डरच्या घशात ते घालू देणार नाही. असे स्पष्ट करून लोकनेते नाईक यांनी सी.सी. न मिळताही या ठिकाणी बिल्डरने कुंपण घातले आहे, याकडेही त्यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले.
येत्या शैक्षणिक वर्षांपासून महापालिकेने नर्सरी ते पदव्यूत्तरपर्यंतचे शिक्षण देण्याची सोय सुरु करण्याची मागणी केली. मराठी, हिंदी विषय सक्तीचे करून इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यात यावे. अमर्याद इमारती बांधून नवी मुंबईचा कोंडवाडा करू नका. त्यामुळे नवी मुंबईतील सुविधांवर ताण निर्माण होईल. नवी मुंबईतील नागरिकांना त्रासात टाकू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मोरबे धरणाच्या जलवाहिनीवरून बिल्डरने मागणी केली म्हणून नवी मुंबईबाहेर पाणी पुरवठा करण्यासाठी बेकायदा जलवाहिनी टाकण्याचा घाट घालण्यात आला आहे. हि गंभीर बाब असून या प्रकारची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. महापालिकेचे आणि नवी मुंबई परिवहनचे कर्मचारी आणि अधिकारी नागरिकांना सेवा देत असतात. त्यांच्या सहयोगाने शहराच्या लौकिकात भर पडत असते. त्यामुळे या घटकांना वाढीव बोनस तसेच सानुग्रह अनुदान देण्याची मागणी लोकनेते आमदार नाईक यांनी बैठकीत केली. लोकनेते आमदार नाईक यांनी बैठकीत केलेल्या सर्व मौलिक सूचनांवर कार्यवाही करण्याची ग्वाही आयुक्त नार्वेकर यांनी दिली.

