आश्वासन न पाळल्यास मनपाविरोधात जनआंदोलन- सुरज पाटील
प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : ” जोपर्यंत आम्हाला कायमस्वरूपी उचित पाणीपुरवठा देण्याचे लेखी आश्वासन मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही दालन सोडणार नाही” असा पवित्रा नेरुळचे ज्येष्ठ मा. नगरसेवक सुरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, मा. नगरसेविका सुजाता पाटील व मा. नगरसेविका जयश्री ठाकुर यांनी घेत, नवी मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांच्या दालनाचा ताबा घेतला. पाणीटंचाई व अनियमित पाणीपुरवठा समस्येबाबत जाब विचारण्यासाठी व त्याचे निवारण करण्यासाठी महापालिका मुख्यालयावर ‘घागर मोर्चा’ काढण्यात आला होता.
नेरुळ विभागातील कुकशेत गाव, सारसोळे गाव आणि सेक्टर- 6, 8 व 10 मध्ये ऐन नवरात्री उत्सवात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एकीकडे महापालिकेच्या स्वतःच्या मालकीचे असे मोरबे धारण ओसंडून वाहत असताना, आमच्या नशीबी पाणीटंचाई का? असा प्रश्नच मोर्च्यात सहभागी महिला रहिवाश्याच्या शहर अभियंता देसाई यांना विचारला. तर, नमूद विभागातील पाणीटंचाई व पाणी पुरवठा वितरण समस्येबाबत शाश्वत तोडगा निघत नाही. तोपर्यंत, दालनाचा ताबा सोडणार नाही. यावर, मोर्चेकरी ठाम होते. मोर्चेकरांसोबत आधी अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील यांची चर्चा फिस्कटल्याने, शहर अभियंता संजय देसाई यांना आयुक्तांसोबतची सुरु असणारी बैठक सोडून मोर्चेकरांसोबत चर्चा करून तोडगा काढण्यासाठी जावे लागले.
तर, मोर्चेकरांच्या मागणीसमोर झुकत महापालिकेने अखेर दोन दिवसांमध्ये दररोज दोन वेळेस कायमस्वरूपी सुनियोजित पाणीपुरवठा करण्यात येईल असे लेखी आश्वासन नेरुळ विभागाचे कार्यकारी अभियंता गिरीश गुमास्ते यांच्याहस्ते देण्यात आले. मात्र, जर दोन दिवसांमध्ये महापालिकेने दिलेले आश्वासन पाळले नाही. तर, मोठया संख्येने महापालिकेच्या विरोधात जनआंदोलन करण्यात येईल. असा इशारा सुरज पाटील यांनी दिला आहे.





