1–2 minutes

सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांची भेट घेऊन तातडीने कार्यवाही करण्याची केली मागणी 

प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : बेलापूर ते पेंधर मेट्रो रेल्वे उन्नत मार्गावरील ‘सेंट्रल पार्क’ स्थानक’ या नावामध्ये ‘मुर्बी’ गावाचा उल्लेख करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांची मुंबईत भेट घेऊन केली. 

खारघर नोड अंतर्गत मुर्बी हे जवळपास दहा हजार लोकवस्ती असणारे गाव पूर्वीपासूनच नावलौकिकास आहे. सिडको तर्फे ‘नवी मुंबई मेट्रो’ प्रकल्पांतर्गत बेलापूर ते पेंधर हा उन्नत मार्ग उभारण्यात आला आहे. या मधील सात क्रमांकाचा स्थानक मुर्बी गावात असतानाही त्या स्थानकाला सिडकोने सेंट्रल पार्क नाव दिले. त्यामुळे यापूर्वीच लोकप्रतिनिधी आमदार प्रशांत ठाकूर आणि तत्कालीन नगरसेवक अभिमन्यू पाटील यांनी ०६ डिसेंबर २०२१ रोजी सिडकोला निवेदन देऊन या स्थानकाच्या नावात ‘मुर्बी’ गावाचा उल्लेख करण्याची मागणी केली होती.

सिडकोने या संदर्भात चालढकलपणा केल्यामुळे नावात बदल झाला नाही. सिडकोच्या या मनमानी कारभाराला आ. प्रशांत ठाकूर व मुर्बी ग्रामस्थांनी विरोध केला असून आपल्या गावाची अस्मिता जपण्यासाठी तसेच या स्टेशनला मुर्बी गाव स्टेशन असे नाव देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी झालेल्या लाक्षणिक उपोषणाला उपस्थित राहून ग्रामस्थांना पाठिंबा दिला होता. तसेच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. त्या अनुषंगाने सोमवारी (दि. १६) आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांची निर्मल भवन येथे भेट घेऊन मुर्बी गावाचे नाव स्थानकाला देण्यासंदर्भात पुनर्मागणी करत तातडीने कार्यवाही करण्याची आग्रही मागणी केली तसेच मागणीचे स्मरण पत्रही दिले. 


Design a site like this with WordPress.com
Get started