1–2 minutes

महाविजय अभियानाचे आयोजन

नवी मुंबई (पालिका प्रशासन) : महाविजय अभियान २०२४ च्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंगळवार (दि. १७) नवी मुंबईमध्ये संघटनात्मक दौरा होणार आहे.  या दौऱ्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रदेशाध्यक्षांचे नवी मुंबई नगरीत जोरदार स्वागत करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज झाले असल्याची माहिती नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दिली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीकरिता संपूर्ण देशभरात महाविजय २०२४ अंतर्गत लोकसभा मतदार संघाची बांधणी सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रीय पातळीवर ४०० प्लस तर महाराष्ट्र राज्यात ४५ पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदार संघात प्रवास सुरू आहे. त्यातील एक भाग असलेल्या ठाणे लोकसभा मतदार संघात मंगळवारी त्यांचा दौरा होणार असून त्यांच्या या दौर्‍याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी चार वाजता प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे नवी मुंबई नगरीत आगमन होईल. ऐरोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर या दौऱ्याचा शुभारंभ होणार आहे. यानंतर वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे त्यांना अभिवादन करतील. पक्षाची माहिती, ध्येयधोरणे, बुथमधील शेवटच्या नागरिकापर्यंत माहिती व्हावी, याकरिता विधानसभा मतदार संघातील तीन ते चार बुथची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आलेल्या विधानसभा वॉरियर्सची बैठक स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात घेणार आहेत.

वॉरिअरच्या बैठकीनंतर वाशी सेक्टर 15 येथील मराठा भवन येथून महाविजय रॅली प्रारंभ होणार आहे.‌ मरीआई माता मंदिर गावदेवीचे दर्शन देखील प्रदेशाध्यक्ष बावनकुळे घेतील. रॅली पुढे मार्गस्थ होईल. रॅली दरम्यान घर घर संपर्क अभियान आणि मेरी माटी मेरा देश अभियान राबविण्यात येणार आहे. विविध भागात फिरल्यानंतर सेक्टर 14 एमजीएम कॉम्प्लेक्स सांस्कृतिक भवन येथे या रॅलीची सांगता होणार आहे.रॅलीच्या सांगता प्रसंगी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे या ठिकाणी चौकसभेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. या दौऱ्याप्रसंगी ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.


Design a site like this with WordPress.com
Get started