प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : गेल्या दशकापासून, मानवी तस्करी हा जगातील संघटित गुन्हेगारीचा सर्वात वेगाने वाढणारा प्रकार बनत आहे. याबाबत, जमसमान्यांमध्ये जागृती होणे आवश्यक असून मानवी तस्करी कायमस्वरूपी बंद करण्याच्या विरोधातील लढाईला न्यायिक बळ देणे आवश्यक आहे. विधी विद्यार्थी आणि विधी क्षेत्रातील कायदेतज्ञांची एकप्रकारे सामाजिक जबाबदारी आहे. असे मत बीसीटी विधी विद्यालय, खांदा कॉलनीच्या प्राचार्या सानवी देशमुख यांनी व्यक्त केले. त्या, ‘मानवी तस्करी’ बाबत महाविद्यालयातर्फे आयोजित जागृतकता अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांच्या ‘वॉक फॉर फ्रीडम’ या रॅलीला संबोधित व मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
सदर रॅलीत सुमारे 222 विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दर्शविला. तर, सीकेटी महाविद्यालयाचे प्रोफेसर एस.एन. परकाळे यांनी, “मानवी तस्करीविरुद्ध विद्यार्थ्यांची ही एकजूट या झोपलेल्या समाजाला जागे करेल” मत व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. सदर उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी सहाय्यक प्राध्यापक राघव शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली बी.सी.टी. महाविद्यालयातील एल.एल.बी. आणि बी.एल.एस. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या एकत्रित कोअर टीमचे विशेष सहकार्य लाभले.
तर, विधी महाविद्यालयातील इतर सहाय्यक प्राध्यापक व शिक्षकोत्तर कर्मचारी इत्यादींनीही सक्रिय सहभाग दाखवला. या जनजागृती रॅलीची बीसीटी विधी महाविद्यालयापासून सुरुवात होवून खांदा कॉलनीतील अंतर्गत भागातून सुमारे पाच किलोमीटरचे अंतर चालून पुन्हा महाविद्यालयाच्या ठिकाणी अंतिम करण्यात आली. रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांनी मानवी तस्करीच्या विरोधात आणि ती कायमस्वरूपी रोखण्यासाठीच्या जनजागृतीबाबत घोषणाबाजी केली.




