1–2 minutes

प्रतिनिधी (पालिका प्रशासन) :  नवी मुंबई महापालिकेची समाज मंदिरे, मैदाने यांच्यासह अन्य सर्व मालमत्तांचे संरक्षण करण्यासह त्या विषयी अन्य महत्त्वाची कामे करण्याची जबाबदारी आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आता विभाग अधिकाऱ्यांवर सोपवली आहे. या संदर्भातील आदेशाचे परिपत्रक नुकतेच काढले आहे.

त्यानुसार, विभाग अधिकाऱ्यांना मालमत्ता विषयासाठी एक स्वतंत्र लिपिक देण्यात आला आहे. यांच्या सहाय्याने मालमत्तांचे वाटप करून भाडे वसुली करणे, एखाद्याने अनधिकृत ताबा घेतला असेल, तर त्याच्यावर कारवाई करणे प्रसंगी त्याच्यावर गुन्हे नोंद करणे, या मालमत्तांचे सरंक्षण करणे. दैनंदिन मार्केट मधील ओटले वाटप करणे, पे अॅण्ड पार्किंग विषयी प्राप्त तक्रारीची चौकशी आणि पंचनामा करण्याचे दायित्व मालमत्ता लिपिकाचे असणार आहे. तसेच बहुउद्देशीय इमारती, हॉल (मंगल कार्यालय), वाटपाच्या तारखांचे नियोजन करणे व भाडे वसुली करणे, रजिस्टरमध्ये अद्यावत नोंदी ठेवणे आणि मासिक अहवाल मालमत्ता विभागास सादर करणे आवश्यक असणार आहे. महापालिका अधिकारी/कर्मचाऱ्यांना वितरीत केलेल्या निवासस्थानाची त्यांच्या वेतनातून केलेल्या भाडे वसुलीचा मासिक अहवाल मालमत्ता विभागास सादर करणे, बहुउद्देशीय इमारती, समाजमंदिरे, व्यायामशाळा’ सांस्कृतिक (सभा/मंडप), अंगणवाडी, विरंगुळा केंद्र, तलाव, नौकाविहार, दुकान गाळे, किऑक्स, आहार केंद्र, दिव्यांग स्टॉलच्या अनधिकृत वापरावर नियंत्रण ठेवणे, थकबाकीदारांची दुकाने सिल करून मालमत्ता विभागाला अहवाल सादर करणे, मालमत्ताची नियमितपणे पाहणी करून काही दुरुस्ती असल्यास उपायुक्तांकडे अहवाल पाठवणे आदी कामे सोपवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे यातील काही कामे यापूर्वीच्या आयुक्तांनी वेळोवेळी परिपत्रकाद्वारे नेमून दिली होती; मात्र या कामात चालढकलपणा होऊन ती प्रलंबित राहिल्याने मुख्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना वरिष्ठांना उत्तरे देताना नाकीनऊ येत होते. याची नोंद घेत आयुक्तांनी मालमत्ता विभागाच्या कामात सुसूत्रता यावी यासाठी वरील सुधारित आदेश काढले आहेत.

मालमत्ता विभागाच्या उपायुक्त स्तरावर (मुख्यालय) सार्वजनिक हितासाठीचे भूखंड हस्तांतरित करून घेणे, त्यावर मनपाने बांधलेल्या मालमत्तांचे अभिलेख आणि खर्चाविषयी नोंद ठेवणे, न्याय प्रविष्ट मालमत्तांची प्रकरणे हाताळणे ही कामे असणार आहेत. हस्तांतरित भुखंडाला कुंपण घालणे, त्यावर इमारत बांधणे, त्याची देखभाल दुरुस्ती करणे ही कामे नेहमी प्रमाणे शहर अभियंता विभागाकडे असणार आहेत.

news by – Vijay


Design a site like this with WordPress.com
Get started