प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : “जनतेसाठी सुरू असलेले बेमुदत उपोषणाचे आंदोलन हे सिडकोची चालढकल वृत्ती आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या अनास्थेच्या विरोधात डोळस यांनी पुकारले असून, डोळस यांनी सातत्याने कागदोपत्री पाठपुरावा करूनही सिडको व नवी मुंबई महानगरपालिकेकडून दुर्लक्ष झाल्यानेच जनतेसाठी डोळस यांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उचलले आहे” अशी प्रतिक्रिया माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी दिली. विशाल डोळस यांच्या उपोषणस्थळी डॉ. नाईक यांनी भेट दिली तेव्हा ते बोलत होते.
सिवूडस सेक्टर 48 ए येथील आरोग्य सुविधा सेवा-सुविधा अंतर्गत सिडकोकडून हॉस्पिटल उभारणीसाठी शुश्रूषा चॅरिटेबल ट्रस्टला अल्पदरात मिळालेल्या भूखंडावर 24 वर्षे उलटूनही हॉस्पिटल कार्यन्वित करण्यात आले नाही. ज्यामुळे, सिवूडस परिसरातील नागरिकांना गेली 24 वर्षांपासून सवलतीच्या दरातील उपचारांपासून वंचित रहावे लागले आहे. त्यामुळे, सदर भूखंडाचा करार रद्दबातल करावा. आणि, आहे अश्या परिस्थितीत हा भूखंड नवी मुंबई महानगरपालिकेला सुपेरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी हस्तांतरित करावा. अशी मागणीसाठी सिवूडस विभागाचे माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी सदर भूखंडाच्या प्रवेशद्वारावरच बेमुदत उपोषण पुकारले आहे.

