1–2 minutes

प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : नवी मुंबईचे शिल्पकार तसेच या शहराविषयी विशेष प्रेम बाळगणाऱ्या माजी कॅबिनेट मंत्री तथा ऐरोली विधानसभेचे विद्यमान आमदार गणेश नाईक यांनी महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजावर दैनंदिन राजकीय देखरेख ठेवण्याकरिता, ज्येष्ठ माजी नगरसेवकांची कोअर कमिटी स्थापन केली आहे. परंतु, या कोअर कमिटीतील काही सदस्यांना गणेश नाईकांच्याच मार्गदर्शनाखाली तयार झालेले, त्यांचे सुपुत्र व भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार संदिप नाईक यांचे नेतृत्व मान्य नाही. ज्यासाठी, हे संकुचित मनोवृत्तीचे सदस्य संदीप नाईकांचे खांदे समर्थक असणाऱ्या युवा आणि नव्या नगरसेवकांचा कायम पाणउतारा करताना दिसतात.

दादा नाईकांच्या कोअर कमिटीत सीबीडी कॉलनीतील नाथ, नेरुळ कॉलनीतीतून इथापे आणि शिर्के, शिरवणे गावातून सुतार, वाशी गावातून भगत, रबाळे झोपडपट्टी बहुल भागातून सोनावणे, ऐरोलीतुन सुतार असे दिग्गज सदस्य आहेत. मात्र, यामधूनच काहींचा संदीप नाईकांच्या नेतृत्वाला विरोध होताना दिसतो आहे.

यामधील, ‘ते’ दोन सदस्य एकमेकांची विशेष काळजी घेत असून एक सदस्य महापालिकेचा अप्रत्यक्ष कंत्राटदार असून, दुसर्या सदस्याच्या वॉर्डात नागरी कामांची कंत्राटे घेण्यात माहीर आहे. तसेच, स्वतःचे व्यक्तिगत शत्रुत्व काढण्यासाठी हे दोघेजण गणेश नाईक यांच्यासमोर संबंधितांविषयी गैरसमज निर्माण होईल अशी मांडणी करण्यात अत्यंत पटाईत आहेत. तसेच, आपल्या नात्यातीलच नेतृत्व संपन्न महिलेची राजकीय कारकिर्दी संपवण्यासाठी एक सदस्य विशेष सक्रिय आहे. तर हे दोन सदस्य अधिकारी वर्गाला चौकशी आणि आंदोलनाची धमकी देत, संदीप नाईकांच्या समर्थकांचे बॅनर उतरविण्यास दबाव आणणे, नागरी विकास कामांच्या फाईली पेंडिंग ठेवणे यासारखे कुकर्म करण्यात धन्यता मानतात.

तर, कोअर कमिटीतील हे दोन सदस्य कायम नवीन उभरत्या आणि विशेषतः संदीप नाईक यांचे खंदे समर्थक असणाऱ्या लोकप्रतिनिधींचे पंख छाटण्यासाठी प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष कारवाया करत असतात. तसेच, हे दोन सदस्य दादांना अंधारात ठेवत आपला उल्लू सरळ करण्यासाठी ‘ताईं’च्या दरबारातही हजेरी लावतात. ज्यामुळे, या दोघांच्या वॉर्डातून २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत गणेश नाईकांना कमी मतदान झाले व ते निवडणूक हरले. परंतु, चार महिन्यातच झालेल्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीत मात्र हे दोघे मताधिक्याने निवडून आले.

 त्यामुळे, या ‘दोन’ सदस्यांना जर का गणेश नाईक यांनी स्वतःपासून तात्काळ स्वरूपात मूळ प्रवाहातून बाहेर काढले नाही किंवा दूर सारले नाही. तर उतरत्या वयातील आपल्या राजकीय कारकिर्दीत गणेश नाईक यांना पक्षीय आणि गृहक्लेशाचा सामना करावं लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Design a site like this with WordPress.com
Get started