नवी मुंबई (पालिका प्रशासन) : लोकनेते आमदार गणेश नाईक पालकमंत्री पदावर कार्यरत असताना सलग पंधरा वर्षे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जनता दरबार उपक्रम राबविणारे एकमेव कॅबिनेट मंत्री होते. आज लोकनेते आमदार नाईक यांच्या जनता दरबार जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात मोठ्या संख्येने नागरिकांनी त्यांच्या समस्यांची निवेदने दिली. तब्बल 830 निवेदने प्राप्त झाली त्यापैकी 476 निवेदनांवर तात्काळ कार्यवाही करण्यात आली. उर्वरित निवेदनांचा निपटारा कालबद्ध करण्यात येणार आहे.
आजच्या जनसंवाद कार्यक्रम प्रसंगी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार आणि भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार माजी महापौर सुधाकर सोनवणे माजी सभागृह नेते रवींद्र इथापे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत उपस्थित होते. जनसंवाद कार्यक्रमात प्रामुख्याने महापालिका पाणीपुरवठा विभाग, विद्युत विभाग, शहर अभियंता विभाग, महावितरण विद्युत विभाग यांच्याशी संबंधित समस्या सोडविण्यात आल्या. महापालिकेच्या वतीने अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता मनोज पाटील आणि त्यांचे वरिष्ठ सहकारी तर महावितरणच्या वतीने अधीक्षक अभियंता गायकवाड आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शहरातील विविध ठिकाणी नागरी सुविधा उपलब्ध करून देणे, पाणीपुरवठा सुरळीत करणे, अखंडित विद्युत पुरवठा, दीर्घकाळ प्रलंबित कामे, इत्यादी विषयी बहुतांश समस्या मांडण्यात आल्या. लोकनेते आमदार नाईक यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे शहर आपलं आहे या कर्तव्य भावनेतून जनतेच्या समस्या सोडविण्याचे आवाहन यावेळी केले. नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने कोणतेही कारण अथवा सबब ऐकली जाणार नाही असे स्पष्ट करून चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निश्चितच कौतुक करू मात्र जे अधिकारी नागरिकांची कामे करणार नाहीत त्यांना त्यांची जागा निश्चित दाखवून देऊ, असेही लोकनेते नाईक म्हणाले. महापालिकेच्या प्रशासकीय कार्यकाळामध्ये शहरामध्ये समस्या वाढल्या. पाणीटंचाई निर्माण झाली. एमआयडीसी कडून मिळणारा नवी मुंबईचा पाणी कोटा सुनिश्चित करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. त्या दृष्टीने त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे अशी सूचना केली.
नागरी सुविधांची कामे करताना ती सर्व प्रभागात समतोल पद्धतीने झाली पाहिजेत. काही घटकांच्या दबावाखाली किंवा स्वार्थामुळे काही अधिकारी ठराविक प्रभागांमध्ये करोडो रुपयांची कामे करतात तर काही प्रभागांमध्ये अत्यावश्यक कामे देखील होत नाहीत याबद्दल संताप व्यक्त केला. नवी मुंबईकरांचा कररूपाने जमा झालेला पैसा कुणाच्या तुंबड्या भरण्यासाठी वापर होत असेल तर ते रोखले जाईल.
लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या आवश्यक कामांची यादी महापालिका आयुक्तांना दिलेली आहे. आगामी अर्थसंकल्पामध्ये या यादीमधील कामे समाविष्ट करण्याची सूचना पालिका प्रशासनाला केलेली आहे. विविध कामांवर महापालिकेतर्फे झालेल्या खर्चाचा लेखाजोखा देखील घेणार असल्याची माहिती लोकनेते आमदार नाईक यांनी दिली. एमआयडीसीने महापालिकेकडे वर्ग केलेले शहरातील चार सुविधा भूखंड परत घेऊन विकले. महापालिका प्रशासनाने हे भूखंड एमआयडीसी कडून परत घ्यायला पाहिजे होते. यापैकी एका सुविधा भूखंडाचा खटला महापालिका उच्च न्यायालयात हरली. महापालिका प्रशासनाने निष्णात वकिलांची नेमणूक करून लोकांच्या सुविधांसाठी मिळवलेले सुविधा भूखंड वाचवले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
मेरी माटी मेरा देश…
नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज मेरी माटी मेरा देश अभियान नवी मुंबईमध्ये राबविण्यात आले. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ठेवलेल्या कलशामध्ये नवी मुंबईतील विविध विभागातून कलेशामधून आणलेली पवित्र माती ठेवण्यात आली. यावेळी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक व अन्य मान्यवर उपस्थित होते. राष्ट्राची उन्नती, विकास आणि स्वतःचा व्यक्तिमत्व विकास अशी पंच प्रण शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली. नवी मुंबईतील एक कलश दिल्ली येथे नेण्यात येणार असून त्या ठिकाणी शहिदांच्या स्मरणार्थ निर्माण केल्या जाणाऱ्या अमृत वाटिका वनामध्ये वृक्षारोपण करता ही माती वापरण्यात येणार आहे. अमृता वाटिका वन शहिदांच्या त्यागाचे देशवासीयांना सदैव स्मरण करीत राहणार आहे.
विद्युत सुविधांसाठी 380 कोटी रुपये
लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या प्रयत्नातून नवी मुंबईसाठी केंद्र सरकारच्या ग्रामविकास विभागामार्फत 380 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पुढील एक वर्षात या निधीमधून नवी मुंबईमध्ये टप्प्याटप्प्याने वीज सुधारणांची कामे केली जाणार आहेत.
दिव्यांग क्रिकेटपटू गंगा कदम हिचा सन्मान
जनसंवाद कार्यक्रम प्रसंगी लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या शुभहस्ते भारताची आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेटपटू गंगा कदम हिचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी दिव्यांग क्रिकेट असोसिएशनचे पंकज चौधरी हे देखील तिच्यासोबत उपस्थित होते. अलीकडे झालेल्या आयसीसी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमध्ये भारताने अजिंक्यपद पटकावले. या यशामध्ये गंगाच्या कामगिरीचा मोलाचा वाटा होता. विशेष म्हणजे आयसीसी टूर्नामेंट करिता जाण्यापूर्वी गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तिला आवश्यक ती मदत करण्यात आली होती

