2–3 minutes

प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : नवी मुंबईतील सिडकोनिर्मित 300 चौरस फूट क्षेत्रफळापर्यंतच्या कंडोमिनियम अंतर्गत नागरी सुविधांची कामे तातडीने हाती घेऊन 300 चौरस फूट क्षेत्रफळापेक्षा अधिक आकाराची घरे असलेल्या वसाहतींमध्ये देखील नागरी सुविधांची निर्मिती करावी, अशी लेखी मागणी लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास खात्याचे प्रधान सचिव आणि नवी मुंबई महापालिका आयुक्त यांच्याकडे 1 सप्टेंबर 2023 रोजी पत्र देऊन केली आहे.

नवी मुंबईत 1972 च्या सुमारास सिडको आली. त्यानंतर सिडकोने ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सीवूड,बेलापूर इत्यादी ठिकाणी अल्प आणि मध्यम अशा विविध उत्पन्न गटांसाठी सदनिका बांधल्या. या वसाहती आता ३० ते ४० वर्षांच्या झाल्यानंतर त्यामधील मलनिःस्सारण वाहिन्या, जलवाहिन्या जुन्या आणि नादुरुस्त झाल्या आहेत. गटारे, पदपथ चौकांची दुरावस्था झाली आहे. या सुविधांची तात्काळ दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. मात्र या वसाहतींमधून राहणाऱ्या सर्वसामान्य रहिवाशांची आर्थिक क्षमता नसल्याने व जलवाहिन्या तसेच मलनिःस्सारण वाहिन्या बदलण्यासाठी होणारा मोठा खर्च उचलणे सदनिका धारकांना शक्य होत नाही. त्यामुळे मलनिसारण वाहिन्या तसेच जलवाहिन्या दुरुस्तीची किंवा त्या नव्याने निर्माण करण्याची कामे ते करु शकत नाहीत. हे सर्व सदनिकाधारक करदाते आहेत. जीर्ण मल वाहिन्यांमुळे या वसाहती परिसरात सांडपाणी साचून राहते. दुर्गंधीचे वातावरण पसरून डेंग्यू आणि मलेरियासारख्या जीवघेण्या रोगांचा फैलाव होतो आहे. परिणामी या वसाहतींमधील रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. आरोग्याच्या दृष्टीने वसाहती अंतर्गत सुविधा कामांची अत्यंत गरज असल्याने सदर कामे महानगरपालिका निधीतून करण्यास शासनाने मान्यता द्यावी, याकरिता सन २०१५ पासून ऐरोली विधान सभा मतदार संघाचे प्रथम आमदार संदीप नाईक तत्कालिन मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, प्रधान सचिव तसेच विधानसभा सभागृहामध्ये विविध आयुधांच्या माध्यमातून कंडोमिनियम अंतर्गत सुविधांची कामे हाती घेण्याची मागणी करीत होते. त्या अनुषंगाने १४ डिसेंबर २०१८ मध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सिडकोनिर्मित ३०० चौ.फूट क्षेत्रफळापर्यंतच्या कंडोमिनियम अंतर्गत सदनिकांची मलनिःस्सारणाची व जलवाहिन्यांची कामे महापालिका निधीतून करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली होती. आमदार निधीमधून देखील वसाहतीमध्ये कामे करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कंडोमिनियम अंतर्गत कामांकरिता आमदार निधी देण्यात येतो परंतु सदरचा निधी कमी पडत आहे. नागरिकांकडून होत असलेल्या मागणीनुसार स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून महानगरपालिका क्षेत्रातील कंडोमिनियम अंतर्गतची कामे नवी मुंबई महानगरपालिकेने स्वखर्चाने तातडीने हाती घेण्याबाबत लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी वेळोवेळी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. परंतु अजून देखील अनेक ठिकाणी वसाहती अंतर्गत कामास सुरुवात करण्यात आलेली नाही. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सिडकोनिर्मित कंडोमिनियम अंतर्गतची कामे करण्यास शासनाने मंजुरी देताना ३०० चौ. फूट क्षेत्रफळापर्यंतच्या कंडोमिनिमय अंतर्गतची कामे करण्यास मंजुरी दिली आहे. परंतु नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये ३०० चौरस फूट क्षेत्रफळापेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या सिडकोनिर्मित वसाहती आहेत. या वसाहतींमधील सदनिकाधारक देखील करदाते असून सर्वसामान्य वर्गातील आहेत. त्यांना देखील मलनिःस्सारण व जलवाहिन्याकरिता होणारा मोठा खर्च उचलणे शक्य नसल्याने ३०० चौरस फूटापेक्षा अधिकच्या क्षेत्रफळ असलेल्या वसाहतींमधील मलनिःस्सारण व जलवाहिन्यांची कामे महानगरपालिका निधीमधून करण्याकरिता शासनाने मंजुरी देण्याची मागणी लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

शासनस्तरावरुन याची तात्काळ दखल घेऊन नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सिडकोनिर्मित कंडोमिनियम अंतर्गत वसाहतीमधील सरसकट मलनिःस्सारण व जलवाहिन्यांची कामे महानगरपालिकेच्या निधीतून करण्याकरिता शासनाने मंजुरी देण्याची मागणी पत्रामध्ये शेवटी करण्यात आली आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started