प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तसेच बेलापूर विधानसभेतील बहुचर्चित, राजकीय – प्रशासकीय दुर्लक्षित आणि प्रतिक्षित अश्या वाशी येथील नियोजित ‘महाराष्ट्र भवन’ भूखंडाचा पाहणी दौरा भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष तथा मा. आमदार संदिप नाईक करणार आहेत. तसेच, यासंबंधीतचा अहवाल संदिप नाईक हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करणार असून, ‘महाराष्ट्र भवन’ उभारणीच्या कार्यवाहिला प्रशासकीय स्तरावर गतिमानता देण्याची विनंती नाईक करणार असल्याचे वृत्त विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाले आहे.
वाशी रेल्वे स्टेशनजवळ देशातील विविध राज्यांना त्यांचे भवन उभारणीसाठी सिडकोने भूखंड प्रदान केले होते. ज्यामध्ये, ‘महाराष्ट्र भवन’साठीही भूखंड देण्यात आला होता. परंतु, सिडकोचा भोंगळ प्रशासकीय कारभार सर्वश्रुत आहे. ज्यामुळे, अद्यापही ‘महाराष्ट्र भवन’ उभारणीच्या कामाचा नारळही फुटलेला नाहीए. ही बाब सर्वच नवी मुंबईकरांसाठी अपमानास्पद असून, स्थानिक राजकीय अनास्था यासाठी जबाबदार असल्याचे सुजाण नागरिकांमध्ये चर्चा आहे.
मात्र, आता राज्यात सत्ताधारी आणि किंगमेकर असणाऱ्या भाजपचे जिल्हाध्यक्ष संदिप नाईक ‘महाराष्ट्र भवन’ उभारणीत लक्ष घालणार असल्याने, सदरहू कामाचा श्रीगणेशा लवकरात लवकर होवून नवी मुंबईकरांच्या सेवेत ‘महाराष्ट्र भवन’ अर्पित होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

