प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : नवी मुंबई भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष पदासाठी एकूण नऊ जणींची नावे चर्चेत आहेत. परंतु, पक्षामध्ये सत्तेत येण्यागोदरपासून कार्यरत असणाऱ्यांना पद बहाल करायचे की, आर्थिकदृष्ट्या सक्षम परंतु, काही वर्षांपूर्वी पक्षात सक्रिय झालेल्याना? याबाबत पक्षश्रेष्ठींचे एकमत होत नसल्याने महिला जिल्हाध्यक्ष पदावर नक्क्की कोणत्या फायरब्रॅंड महिलेची वर्णी लागणार यावर अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहे.
भाजपने केंद्र व राज्यातील शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून विविध योजनांद्वारे महिला वर्गाला दिलासा देण्याचे कार्य 2014पासून सातत्याने सुरू आहे. तसेच, परिवारातील महिलांचे वाढते नेतृत्व पाहता विविध समाजातील महिलांना पक्षाकडे आकर्षित करून त्याचे रूपांतर निवडणुका जिंकण्यासाठीच्या मातांमध्ये करणे आवश्यक आहे. त्यासाठी, पक्षाच्या जिल्हा महिला मोर्चा विभागाची सूत्रे ही राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलेकडेच देण्याचा विचार वरिष्ठांचा असल्याचे समजते.
तर, या महिला जिल्हाध्यक्ष पदासाठी मा. नगरसेविका तथा स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, मा. जिल्हा महामंत्री मंगला घरत, मा. युवती जिल्हाध्यक्ष सुहासिनी नायडू, मा. नगरसेविका माधुरी सुतार, मा. नगरसेविका अपर्णा गवते, मा. जिल्हा उपाध्यक्षा विजया घरत, मा. नगरसेविका वैशाली नाईक, मा. जिल्हा महामंत्री कल्पना छत्रे, मा. सीबीडी- बेलापूर मंडळ अध्यक्ष दिपाली घोलप इत्यादींची नावे चर्चेत आहेत. तसेच, बेलापूर विधानसभा क्षेत्रातून जिल्हाध्यक्ष पदासाठी ऐरोली विधासभा क्षेत्रापेक्षा अधिकजणी इच्छुक असल्याने, आमदार मंदाताई म्हात्रे यांचा वरदहस्त असणाऱ्या महिलेच्या गळ्यातच जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडणार असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे.

