प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : ऐतिहासिक धार्मिक पार्श्वभूमी असणारे तुर्भे गावाची कमान सत्ताधारी तीन माजी नगरसेवकांच्या हाती असूनही, या गावातील अंतर्गत रस्ते खड्ड्यात गेल्याचे निदर्शनास पडत आहे. गावातील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांवर पुष्कळ प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना पाठीच्या मणक्याचे आजार होऊ लागले आहेत.
नवी मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक शौालयाकडून तुर्भे नाकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मंजुला सायकल मार्ट ते हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच सामंत शाळा, तलाठी कार्यालय ते तुर्भे गाव प्रवेशद्वार कमान, पेट्रोल पंप मागील सर्व्हिस रस्ता, जैन मंदिर रस्ता आदी ठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहेत. तुर्भे येथील चिराग हॉटेलपासून भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक रामचंद्र घरत यांच्या निवासाकडे जाणारा मुख्य रस्ता खड्ड्यांनी व्यापलेला आहे. चिराग हॉटेल ते गणराज हॉटेल समोरील रस्त्याचीही पूर्णपणे चाळण झाली आहे.
तुर्भे गाव तीन नगरसेवकांच्या मध्ये विभागला आहे. असे असतानाही या ठिकाणचे रस्ते खड्डे मुक्त होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. या खड्ड्यांमुळे किरकोळ अपघातही होत आहेत. इतकेच नाही, तर मणक्याचे आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिकच फटका बसत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून येथील रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सर्व ठिकाणचे खड्डे तात्पुरते स्वरूपात भरले जातात. तर, पाऊस कमी होताच त्या ठिकाणचे खड्डे पुन्हा भरून घेऊन डांबरीकरणही करण्यात येत आहेत, अशी माहिती कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी दिली आहे.

