प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : सानपाडा रेल्वे स्थानक ते एपीएमसी मार्गावर मागील काही महिन्यांपासून फेरीवाल्यांनी उच्छाद मांडला आहे. येथील फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याने महापालिकेने हा मार्ग फेरीवाल्यांना आंदणच दिला आहे की काय अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आलेल्या तुर्भे येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ, भाजी, मसाला, धान्य या मार्केटच्या परिसराला फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. एपीएमसी प्रशासन आणि महापालिका यांच्याकडून या फेरीवाल्यांना अभय मिळत असल्याने या फेरीवाल्यांची मुजोरी इतकी वाढली आहे की ते आता फुटपाथ बरोबरच थेट रस्त्यावर देखील बसू लागले आहेत. त्यामुळे सकाळी एपीएमसी फळ मार्केट ते भाजी मार्केट या मार्गावरील पदपथ पादचाऱ्यांना चालण्यासाठी उपलब्ध नसतो. तसेच सिटी मॉल ते एपीएमसी सिग्नलच्या सर्व्हिस रोडवर २० कांदे बटाटे विक्रेते, १० न्हावी (केस कापणारे) यांनी पदपथ बळकावला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणच्या फेरीवाल्यांवर कारवाई करून हा पदपथ नागरीकांना ये जा करण्यासाठी उपलब्ध करून दिला जात नव्हता. याची नोंद मानव अधिकार आयोगाने घेऊन सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती. त्या वेळी तुर्भे विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कारवाई करून त्याचे फोटो आयोगाला सादर केले होते. त्यांनतर पुन्हा कांदे बटाटे विक्रेते आणि न्हावी यांनी महापालिकेच्या कारवाईला ठेंगा दाखवत फुटपाथवरती बांबू रोवून पावसाळी शेड उभारले आहे. या ठिकाणी प्रत्येक विक्रेत्याकडे वीस ते पंचवीस गोणी कांदा तसेच बटाटा साठवून ठेवलेला असतो. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी कोणी हा माल चोरून नेऊ नये यासाठी सुमारे १५ हजार रुपये सुरक्षारक्षकावर खर्च करून या मालाची रखवाली केली जाते. यावरूनच येथे होत असलेला आर्थिक व्यवहाराची उलाढाल किती असेल याचा अंदाज बांधला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.
त्याच प्रमाणे भाजी मार्केटच्या विरुद्ध बाजूकडील रस्ता ते माथाडी भवन चौक पर्यंत १५ ते २० कांदे बटाटे विक्रेत्यांची टेम्पो लागलेले असतात. यावरही महापालिका आणि एपीएमसी वाहतूक पोलीस, एपीएमसी पोलीस ठाणे यांच्याकडून दुर्लक्ष केले जाते. एपीएमसी सिग्नल ते भाजीपाला मार्केट जावक गेट, याच जावक गेटच्या विरुद्ध बाजूचा सर्व्हिस रोड, माथाडी भवन ते जलाराम मार्केट चौक, सानपाडा हायवे सिग्नल ते एपीएमसी सिग्नल या ठिकाणी फेरीवाल्यांनी पदपथावर बस्तान मांडले आहे. त्यामुळे एपीएमसी मार्केट मध्ये येणारे कामगार, खरेदीदार आदी पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागत आहे. परिणामी अनेकदा किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे अपघात होत असल्याची नोंद वाहतूक पोलीस शाखेकडे आहे. महापालिका तक्रार आली की कारवाई करते. त्यानंतर फेरीवाले पुन्हा पदपथ आणि रस्ते बाळकावून या कारवाईला ‘हप्त्याच्या’ जोरावर भीक घालत नसल्याचे कृतीतून दाखवून देत आहेत.

