प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : नवी मुंबई महापालिकेच्या सिवुड्स येथील शाळा क्रं. ९३च्या इमारत आणि प्रवेशद्वाराच्या दरम्यान असणाऱ्या मोकळ्या उघड्या जागेवर पत्राशेड बांधण्याची एक महिन्यापूर्वी केलेली मागणी, अद्यापही शिक्षण विभागाच्या उपायुक्तांच्या नाकर्तेपणामुळे अधांतरित आहे. ज्यामुळे, शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेस पाऊस पडल्यास गोंधळ उडून पालक व विद्यार्थ्यांना पावसात भिजावे लागत आहे.
महापालिकेची सिवुड्स येथील सिबीएसई माध्यमाच्या शाळॆला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच, सदर शाळा हि आकांशा फाऊंडेशन या खाजगी समाजसेवी संस्थेकडून चालवली जात असल्याने येथील शिक्षणाचा दर्जा सुयोग्य असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. मात्र, या शाळेची इमारत व त्याची देखभाल संपूर्णतः महापालिकेची जबाबदारी आहे. परंतु, शिक्षण विभाग या इमारतीला आवश्यक असणारी पायाभूत सुविधा उभारून देण्यास असमर्थता दाखवत आहे. यामागे, सभोवताल परिसरातील खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेला फायदा पोहचविण्याची छुपी खेळी शिक्षण विभागातील उपायुक्त आणि शिक्षण अधिकारी यांची असल्याचे समजते.
सदर, शाळेच्या इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या आतील भागातील मोकळ्या जागेत पत्राशेड उभारण्याचे लेखी निवेदन पत्र १३ जुलै रोजी महापालिकेच्या शिक्षण विभाग तसेच आयुक्तांना देऊनही अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे, गरजू कुटुंबातील विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण शिक्षण विभागाचे आहे कि काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, सहाय्यक आयुक्त असणाऱ्या कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याला शिक्षण उपयुक्त पदावर बसवल्याने ‘ना’-लायक वृत्ती निदर्शनास येत असल्याची चर्चा पालिकेत दबक्या आवाजात आहे.

